दटके, शेळकेंविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

नागपूर - एम्प्रेस मॉल परिसरातील विहिरीत दगावलेल्या तिन्ही मजुरांचे मृतदेह मॉलमध्ये ठेवून गैरकायद्याची मंडळी जमवून तणाव निर्माण करून विनापरवानगी निदर्शने केल्याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी माजी महापौरासह प्रवीण दटके, युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल केले. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

नागपूर - एम्प्रेस मॉल परिसरातील विहिरीत दगावलेल्या तिन्ही मजुरांचे मृतदेह मॉलमध्ये ठेवून गैरकायद्याची मंडळी जमवून तणाव निर्माण करून विनापरवानगी निदर्शने केल्याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी माजी महापौरासह प्रवीण दटके, युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल केले. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

शनिवारी दुपारी एम्प्रेस मॉल परिसरातील विहिरीची साफसफाई करताना विषारी वायूमुळे दीपक गवते, (४२) रा. सुगतनगर, चंद्रशेखर बारापात्रे (४०) आणि अजय गारुडी (४३) यांचा मृत्यू झाला. संतप्त कुटुंबीयांनी त्यांचे मृतदेह सरळ एम्प्रेस मॉलमध्ये आणून ठेवले. या वेळी आक्रमक पवित्र्यामुळे मॉलमध्ये खळबळ उडाली. 

माजी महापौर प्रवीण दटके, नगरसेवक बंटी शेळके,  रमेश पुणेकर, सुभाष ढबाले, नितीन मेश्राम, नितीन कानोरकर, सुरेश गोजे यांनी पक्षातील ६० ते ७० कार्यकर्ते एम्प्रेस मॉलमध्ये बोलावले. तेथे नारे-निदर्शने केली. मृतांच्या कुटुंबीयांना त्वरित आर्थिक मोबदला द्या, अन्यथा मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका घेतल्याने मॉलमध्ये  खळबळ उडाली होती. राजकीय नेत्यांच्या भूमिकेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. पोलिसांनाही दमदाटी कार्यकर्ते करीत होते. पोलिसांच्या आदेशाचे पालन न करता गैरकायद्याची मंडळी जमविल्यामुळे माजी महापौर, नगरसेवकांसह ७० कार्यकर्त्यांवर गणेशपेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार
रविवारी रात्री अकरा वाजता पोलिस उपायुक्‍त राहुल माकणीकर यांनी मृतांच्या नातेवाइकांची मनधरणी केली. त्यांची समजूत काढली. कायदेशीररीत्या लढाईत पोलिस सोबत असल्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर नातेवाइकांनी रात्री उशिरा तीनही मृतदेह घरी नेले. आज दुपारी वेगवेगळ्या घाटांवर तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

व्हॉट्‌सॲपवर ‘खिल्ली’
मृतदेहांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार प्रवीण दटके आणि नगरसेवक बंटी कुकडे, रमेश पुणेकर यांनी केल्याचे मॅसेज राजकीय क्षेत्रांतील व्हॉट्‌सॲप ग्रुपवर होते. यासह ‘पब्लिसिटी स्टंटबाजी’ करण्यासाठी कमीत कमी मृतदेह तर सोडा, अशा सूचनाही दटके यांना दिल्याचे मॅसेज दिवसभर फॉरवर्ड होत होते. या नेत्यांची खिल्ली उडविणारे अनेक मॅसेज फिरत होते, अशी माहिती आहे.

Web Title: empress mall incident crime