इमारत सोडून दुकाने आली रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

गोंदिया - सव्वालाख लोकसंख्येचा टप्पा पार केलेल्या गोंदिया शहराला अतिक्रमणाने विळखा घातला आहे. पाहावे तिकडे अतिक्रमणाचे जाळे पसरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पायवाट काढताना तारेवरची कसरत करावी लागते. असे असतानाही आज नाही तर, उद्या नक्की अतिक्रमण हटवू, असे सांगता सांगता नगरपालिकेचा घसा कोरडा पडला आहे; तरीही अतिक्रमण हटविण्याचा मुहूर्त अद्याप काही सापडला नाही. 
तांदूळनगरी सोबतच व्यापारनगरी म्हणून गोंदियाची ओळख आहे.

जिल्हाधिकारी, मिनी मंत्रालय अशी ओळख असलेली जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसील कार्यालय, बांधकाम विभाग अशा शासकीय कार्यालयांसह अनेक निमशासकीय, खासगी कार्यालयांचा पसारा शहरात आहे. अशा या शहरात व्यापाऱ्यांनी आपले जाळे विणले; तेही रस्त्यावर. गोरेलाल चौक, गांधी प्रतिमा चौक, सिंधी कॉलनी, मुख्य बाजार परिसर, तेली लाइन, चणा लाइन, स्टेडियम परिसर, आंबेडकर चौक, मनोहर चौक हे शहरातील प्रमुख अन्‌ गजबजलेले रस्ते. याच रस्त्यावर व्यापाऱ्यांनी दुकानदारी थाटली आहे. दुकानाची इमारत सोडून १५ फूट पुढे दुकानातील साहित्य मांडत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करताना तारेवरची मोठी कसरत करावी लागते. मग वाहने कशी पुढे सरकतील, हा प्रश्‍न आहे. थेट नगरपालिका कार्यालयासमोर अनेकांनी दुकाने थाटली आहेत. मात्र, ही दुकाने हटविण्याचे सौजन्य प्रशासन दाखवीत नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष म्हणावे की आणखी काही? हेच समजेनासे झाले आहे. सव्वालाख लोकसंख्या असलेल्या शहरातील अतिक्रमण कधी हटेल, याचेच वेध लागले आहे.

शहरात अतिक्रमण वाढले आहे, हे खरे आहे. परंतु, काही कार्यालयीन कामांमुळे हा मुद्दा मागे पडला. येत्या एक ते दीड महिन्यात शहर अतिक्रमणमुक्त केले जाईल. त्यादृष्टीने पाऊल उचलले जातील.
-चंदन पाटील, मुख्याधिकारी नगरपालिका, गोंदिया.

मोकाट जनावरांचा प्रश्‍नही गंभीर 
शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे. रस्त्याच्या मधोमध ही जनावरे उभी राहात असल्याने आवागमनास नागरिकांना त्रास होतो. वर्दळीच्या ठिकाणी एकीकडे अतिक्रमण; तर, दुसरीकडे या जनावरांची भीती यामुळे नागरिकांसमोर ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती उभी ठाकली असते. जनावरांच्या बाबतीतही अनेक तक्रारी पालिकेकडे करण्यात आल्यात. परंतु, या तक्रारींची दखल प्रशासनाने घेतली नसल्याचे दिसते. 

Web Title: encroachment in gondia