video : का पसरला अतिक्रमणाचा रोग? जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

महापालिकेच्या सभागृहात अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी अतिक्रमणाची व्याख्या स्पष्ट केली. कुठल्याही शासकीय, निमशासकीय जागांवर अनधिकृत बांधकाम करणे म्हणजे अतिक्रमण असल्याचे त्यांनी सांगितले. मालकीची जागा नसताना त्यावर अनधिकृत बांधकाम करणे हे अतिक्रमण असल्याचे महापालिकेतील कामगार संघटनेचे जम्मू आनंद यांनी सांगितले. 

नागपूर : शहराला अतिक्रमणाची लागण झाली असून, महापौर संदीप जोशी यांनी या रोगावर ठोस उपचारासाठी पाऊल उचलले आहे. नागरिकांना रुंद रस्ते, सहज चालणारे फूटपाथ हवे असल्याने महापौरांची भूमिका त्यांना न्याय देण्याची दिसून येत आहे. मात्र, अतिक्रमणाचा रोग का पसरला? याबाबतच्या तपशिलाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. अनेक व्यापारी, नागरिकांनी अनेकदा निवेदन, तक्रारी करूनही प्रशासनाने अतिक्रमणे हटविली नसल्याची व त्यामुळे ती वाढत गेल्याची माहिती पुढे आली आहे. फेरीवाल्यांनाच अतिक्रमणधारक सिद्ध करून अधिकारी फेरीवाला संरक्षण व नियमन कायद्याचेही उल्लंघन करीत असून आयुक्त, पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी अंधारात ठेवल्याचे दिसत आहे.

 

हेही वाचा - टाकीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू
 

शनिवारी पार पडलेल्या महापालिकेच्या विशेष सभेत अतिक्रमणावरील चर्चेदरम्यान भाजपचे नगरसेवक अविनाश ठाकरे यांनी अतिक्रमण या शब्दाची व्याप्ती, व्याख्या विचारली होती. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी "कुठल्याही शासकीय, निमशासकीय जागांवर अनधिकृत बांधकाम करणे म्हणजे अतिक्रमण' असल्याचे नमूद केले. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेचे अधिकारी केवळ हातठेले, भाजीविक्रेते, टपरी हटवून अतिक्रमण हटविल्याचा बनाव करीत नागरिकांच्याच नव्हे तर आयुक्त, पदाधिकाऱ्यांच्याही डोळ्यात धूळफेक करीत असल्याचे दिसून येत आहे. 

फेरीवाल्यांच्या संरक्षणार्थ कायदा असून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत अधिकाऱ्यांनी अशी अनेकदा अतिक्रमणविरोधी कारवाई केली. दुसरीकडे पक्के बांधकाम करून रस्त्यांपर्यंत अतिक्रमण करणाऱ्या विविध बाजारपेठेतील दुकानदारांकडे मात्र जाणीवपूर्वक डोळेझाक केली. शहरातील कोणताही भाग, बाजारपेठ याला अपवाद नाही. आता अतिक्रमण समूळ उपटून फेकण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले आहे. त्यामुळे फेरीवाले, व्यापारी वर्गातही चिंतेचे वातावरण आहे.

 

असे का घडले? - घृणास्पद, दोन भावंडांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

 

शहरातील अतिक्रमणाचा सफाया व्हावा, यासाठी प्रत्येकजण आग्रही आहे. मात्र, काहींनी फेरीवाल्यांच्या उपजीविकेवर पाय देण्याऐवजी त्यांच्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांच्या कडेला कार पार्किंग केले जाते. तेही एकप्रकारे अतिक्रमणच आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाईसाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याचे महापालिकेतील कामगार नेते जम्मू आनंद यांनी नमूद केले. फेरीवाल्यांना अतिक्रमणधारक म्हणणेच चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

Image may contain: outdoor
रहदारीच्या अमरावती मार्गावर ट्रॅव्हल्सच्या अतिक्रमणामुळे नागरिकांवर कायम अपघाताची टांगती तलवार आहे

जयताळा, खामला साप्ताहिक बाजारामुळे रस्ते अरुंद होऊन मोठी समस्या निर्माण होत असल्याचे खामला व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद जेठानी यांनी नमूद केले. हॉकर्स दुकानांपुढे उभे राहतात. हॉकर्ससाठी हक्काची जागा महापालिकेने द्यावी, असे जेठानी म्हणाले. अनेक व्यापाऱ्यांनीही दुकानांपुढे पक्के बांधकाम करून अतिक्रमण केल्याचेही त्यांनी "सकाळ'सोबत बोलताना सांगितले. इतवारीतील होलसेल अनाज मार्केटचे प्रताप मोटवानी यांनीही अमरदीप टॉकीज परिसरातील दुकानांपुढील फळविक्रेते, भाजीपाला विक्रेत्यांची समस्या असल्याचे सांगितले. 

अवश्य वाचा -  पतीने कवटाळले मृत्यूला; "छोटीसी लव्हस्टोरी'चा थरारक अंत

भाजीबाजारासाठी वेगळी जागा देण्याबाबत महापालिकेला अनेक निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नसल्याचेही ते म्हणाले. एवढेच नव्हे तर अनधिकृत बांधकामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे महालातील दुकानदार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वेदप्रकाश आर्य यांनी दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. एमआरटीपी ऍक्‍टनुसार अनधिकृत बांधकामावर कारवाईबाबतची 40 हजारांवर प्रकरणे प्रलंबित असल्याचे आर्य म्हणाले. यातूनच महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा कारवाईबाबतचा भेदभाव स्पष्ट होत असून पुढेही अधिकाऱ्यांनी हीच भूमिका कायम ठेवल्यास शहरात असंतोष माजण्याची शक्‍यता बळावली आहे. 

Image may contain: 1 person, outdoor
ऑटोचालकांनी रस्ता आणि फूटपाथ ताब्यात घेतल्याने रस्त्याच्या मध्यभागातून जाताना विद्यार्थी

कारवाईच्या पद्धतीवर मतभिन्नता

अतिक्रमण हटवावे याबाबत महापालिकेतील सत्ताधारी भाजप व विरोधी बाकावरील कॉंग्रेस सदस्यांची मते सारखीच आहेत. मात्र, कारवाईच्या पद्धतीबाबत मतभिन्नता दिसून येत आहे. फेरीवाल्यांवर कारवाईबाबत कायद्याचा आधार घेण्याचा आग्रह कॉंग्रेसने धरला आहे तर वाहतुकीसाठी व नागरिकांसाठी अडथळा ठरत असलेल्या प्रत्येक अतिक्रमणावर ठोस कारवाईची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे. 

Image may contain: one or more people, tree, sky and outdoor
रस्त्यांवर 24 तास उभे असलेले ट्रक

 

'सकाळ'ची भूमिका

सर्व नगरे-गावे अतिक्रमणाच्या आजाराने ग्रस्त आहेत. नागपूर नावाची कथित "स्मार्ट सिटी'ही त्याला अपवाद नाही. अजून वेळ गेलेली नाही. नागपूरकर बदलण्यास तयार आहेत. शासन आणि प्रशासनाने आपपरभाव न ठेवता नियमानुसार कारवाई केल्यास न्यायाचे होईल. या शहराला केवळ फेरीवाल्यांचा त्रास नाही. वाहतूक कोंडीस कारण ठरणाऱ्या हॉटेलवाल्यांचा, रस्ते अडवणाऱ्या ऑटोवाल्यांचा, पार्किंगची जागा न ठेवता उभ्या झालेल्या हॉस्पिटल्सचा, छोट्या-मोठ्या दुकानांनी रस्ते गिळंकृत केल्याने निर्माण झालेल्या गर्दीचा आणि अशा अनेक गोष्टींचा त्रास आहे. त्यामुळे या प्रकरणी भेदभाव नको. तरच सर्वांची साथ मिळेल. अन्यथा हे सारे मुसळ केरात जावे यासाठी झारीतले शुक्राचार्य टपून बसले आहेत. 

 

ही बातमी अवश्य वाचा -  दोन दिवसांपूर्वी झाली होती बेपत्ता, अखेर सापडला मृतदेह

 

फेरीवाले अतिक्रमणकर्ते नाहीत
अतिक्रमण हटविणे योग्यच आहे. परंतु, अतिक्रमणाची व्याख्या अधिकाऱ्यांनी पाहावी. फेरीवाले अतिक्रमणकर्ते नाहीत. पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांनी फेरीवाला उपजीविका कायदा 2014 वाचून काढावा. फेरीवाले कमी दरात आवश्‍यक साहित्य विक्री करून सामान्य व गरीब नागरिकांची गरज भागवितात. त्यांच्यासाठी महापालिकेने शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जागा आरक्षित केल्यास रस्त्यांवरील विक्रेत्यांची संख्या कमी होईल. 
- जम्मू आनंद, 
कामगार, हॉकर्स संघटनेचे नेते

महापौरांचा निर्णय स्वागतार्ह
अतिक्रमणामुळे सामान्य नागरिक त्रस्त असून, महापौरांचा निर्णय स्वागतार्ह आहे. खामल्यात अनेक दुकानांपुढे फेरीवाले उभे राहतात. त्यामुळे दुकानात येणाऱ्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, व्यवसायाची मुभा फेरीवाल्यांनाही आहे. त्यामुळे महापालिकेने त्यांच्यासाठी जागा निश्‍चित करावी. काही व्यापाऱ्यांनी दुकानापुढे पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले, त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. 
- विनोद जेठानी,
उपाध्यक्ष, खामला व्यापारी असोसिएशन

 

Image may contain: one or more people, people sitting, motorcycle and outdoor
मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील फूटपाथ कवेत घेणारे दुकानदार

वेगळा बाजार तयार करून द्यावा
इतवारीतील होलसेल धान्य बाजारात दुकानांपुढेच भाजीविक्रेते बसतात. फळविक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात हातठेले लागत असल्याने ग्राहकांना दुकानात येतानाच नव्हे तर रस्त्यांवरून जातानाही त्रास सहन करावा लागतो. या विक्रेत्यांसाठी धान्य बाजारापासून वेगळा बाजार महापालिकेने तयार करून द्यावा. याच भागात मनपाची मोकळी जागा असून तेथे पार्किंग किंवा प्रसाधनगृह तयार करावे, यासाठी अनेकदा निवेदन दिले, परंतु काहीही झाले नाही. 
- प्रताप मोटवानी, 
सचिव, होलसेल अनाज बाजार इतवारी

कसं काय बुवा? - 'इंग्लिश किट'ने वाढणार विषयाकडे ओढा; शिक्षकांना मिळणार प्रशिक्षण

 

नोटीस देऊन गप्प का बसतात?
अतिक्रमण कारवाईला विरोध नाही. परंतु, कारवाईत भेदभाव केला जात आहे. गेल्या काही वर्षात एमआरटीपी ऍक्‍टअंतर्गत कारवाईच्या 40 हजारांवर प्रकरणे महापालिकेत प्रलंबित आहे. ते अतिक्रमण का तोडले जात नाही. यात जर आम्हा दुकानदारांचाही समावेश असेल तर तेही तोडावे. 2012-17 या काळात अनेकांना नोटीस दिली. परंतु, कारवाई केली नाही. अधिकारी नोटीस देऊन गप्प का बसतात? याचाही विचार करावा. 
- वेदप्रकाश आर्य,
महाल येथील दुकानदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encroachment increased in Nagpur