Vidhan Sabha 2019 : धमाकेदार यात्रांनी प्रचाराचा शेवट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शनिवारी सायंकाळी पाच वाजता संपला. त्यापूर्वी सकाळपासूनच सहा मतदारसंघांत आक्रमक प्रचार सुरू होता. सकाळी प्रचारसभांपासून सुरू झालेला प्रचार सायंकाळी मोठ्या रॅलींनी संपला. कार्यकर्ते निवांत झाले असले तरी उमेदवार व समर्थक येत्या 24 तासांच्या नियोजनात लागले आहेत. 

नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शनिवारी सायंकाळी पाच वाजता संपला. त्यापूर्वी सकाळपासूनच सहा मतदारसंघांत आक्रमक प्रचार सुरू होता. सकाळी प्रचारसभांपासून सुरू झालेला प्रचार सायंकाळी मोठ्या रॅलींनी संपला. कार्यकर्ते निवांत झाले असले तरी उमेदवार व समर्थक येत्या 24 तासांच्या नियोजनात लागले आहेत. 
नागपूर जिल्ह्यातील यावेळीच्या विधानसभा निवडणुकीत सर्वांत चर्चेत आलेल्या सावनेर मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटणसावंगी येथे प्रचारसभेतून तोफ डागली. सुनील केदार यांनी सावनेरमध्ये प्रचारसभा घेत अमित शहांसह मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. खापरखेडा येथेही त्यांनी प्रचारसभा घेतली. कामठी मतदारसंघातील भाजपचे टेकचंद सावरकर व कॉंग्रेसचे सुरेश भोयर यांनी रॅली काढून प्रचार केला. मौदा तालुक्‍यात मात्र प्रचार थंडावल्याचे चित्र सकाळपासूनच दिसत होते. दोन्ही उमेदवारांना कामठी व नागपूर शहरालगतच्या भागावर प्रचार केंद्रित केला होता. उमरेड मतदारसंघात राजेंद्र मुळक तीन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. ते कॉंग्रेसचे उमेदवार राजू पारवे यांचा धडाक्‍यात प्रचार करीत असून, उमरेड शहारातील दुचाकी रॅलीने प्रचाराची सांगता झाली. 
काटोल मतदारसंघात अखेरच्या दिवशी भाजपचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रचारासाठी नरखेड येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभा घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या परंपरेनुसार नरखेड येथे प्रचारसभा घेत प्रचाराला पूर्णविराम दिला. हिंगणा मतदारसंघात अखेरच्या दिवशी भाजपचे उमेदवार समीर मेघे यांनी सिने अभिनेत्यांना बोलावून आकर्षक शेवट केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विजय घोडमारे यांनी अखेरच्या दिवशी शांत संयमी प्रचार केला. 
रामटेकमध्ये प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्व उमेदवार आजनी गावात एकत्र आले. पेंच धरणाचा कालवा फुटल्याने आजनी गावात पाणी शिरल्यावर भाजपचे डी. एम. रेड्डी, कॉंग्रेसचे उदयसिंग यादव, प्रहारचे रमेश कारेमोरे व शिवसेनेचे बंडखोर व अपक्ष उमेदवार आशीष जयस्वाल यांच्यासह बसपचे उमेदवार संजय सत्यकार यांनी भेटी दिल्या. आशीष जयस्वाल यांनी रॅली काढून प्रचाराचा शेवट केला. रेड्डी यांच्यासाठी देवलापार येथे नितीन गडकरी यांची सभा झाली. गांधी चौकात रेड्डी यांनी सभा घेऊन प्रचार संपविला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: End of campaign