कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळयात ; घरकुलाच्या बिलाची रक्कम मंजुरीसाठी मागितली लाच

संदीप रायपुरे
शनिवार, 21 एप्रिल 2018

घरकुलाच्या बिलाची साठ हजार रूपयाची रक्कम मंजूर करून दिल्याबद्दल व पुढील बिले काढण्यासाठी लाच मागणाऱ्या कंत्राटी अभियंत्याला आज लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

गोंडपिपरी (चंद्रपूर) : घरकुलाच्या बिलाची साठ हजार रूपयाची रक्कम मंजूर करून दिल्याबद्दल व पुढील बिले काढण्यासाठी लाच मागणाऱ्या कंत्राटी अभियंत्याला आज लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दुपारच्या सुमारास पंचायत समिती गोंडपिपरी येथे दोन हजाराची लाच स्वीकारताना त्याच्यावर कार्यवाही करण्यात आली.

श्री संत मिराबाई सेवा सहकारी संस्था मर्या. चंद्रपूर यांच्यामार्फत रूपेश बंडू निकोडे हा पंचायत समिती गोंडपिपरी येथे गृहनिर्माण अभियंता म्हणून कार्यरत आहे. शिवणी येथील एका नागरिकाला घरकुल मंजुर झाले होते. त्याला सुरवातीचे साठ हजार रूपयांचे बिल निकोडे यांनी मंजूर करून दिले होते. पुढील बिल मंजुर करणे बाकी होेते. मी तुला साठ हजार रूपये मंजुर करून दिले. पुढील बिलही मिळवून देतो पण त्यासाठी पाच हजार रूपये द्यावे लागतील म्हणत लाचेची मागणी केली.

दरम्यान, लाच देण्यास अनुत्सुक असल्याने लाभार्थ्याच्या मुलाने लाचलुचपत विभागाकडे याप्रकारची तक्रार केली. यानुसार आज दुपारच्या सुमारास तक्रारदाराकडून दोन हजार रूपये स्वीकारताना रूपेश निकोडे याला एसीबीकडून रंगेहाथ पकडण्यात आले. पंचायत समितीच्या बांधकाम कक्षात ही कार्यवाही करण्यात आली.

एसीबीचे पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, महेश मांढरे, संतोष येलपुलवार, अजय बागेसर, राहुल ठाकरे यांनी पार पाडली. कंत्राटी कर्मचाऱयांकडून लाचेची मागणी केल्याच्या या प्रकाराने प्रशासकीय व्यवस्थेची भयानक वाटचालीबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: engineer found guilty to Anti Corruption Bureau taking bribe