‘वातावरण’ चांगलं नाही, हे सिद्ध झालं!

‘वातावरण’ चांगलं नाही, हे सिद्ध झालं!

नागपूर - ‘वातावरण चांगलं नाही, हे सांगण्याचा मी गेले अनेक दिवस प्रयत्न करतेय. या घटनेवरून तेच सिद्ध झालं,’ अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांनी यवतमाळमधील नाट्यमय घडामोडींवर एका निकटवर्तीयाकडे व्यक्त केली. नाव न सांगण्याच्या अटीवर संबंधित व्यक्तीने ‘सकाळ’ला ही माहिती दिली. 

सहगल यांनी डेहराडून येथून एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, ‘‘असहिष्णुतेवर भाष्य करणार असल्याने मला विरोध होत असावा. साहित्य संमेलनाला कोणा कोणाला निमंत्रित केले याची मला माहिती नाही. माझे भाषण तयार होते. माझ्या शब्दांना ते घाबरले असावेत. देशातील सध्याच्या वातावरणावर मी बोलणार होते.’’

‘‘गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा पसरवली जात आहे. जमावाकडून लोकांचे खून केले जात आहेत. या घटनांबद्दल कोणालाही पकडले गेले नाही.  त्यांना मंत्र्यांचाच पाठिंबा आहे, ही शरमेची बाब आहे. याविरुद्ध सगळ्यांनी एकत्रितपणे आवाज उठविला पाहिजे. रामचंद्र गुहा, नसरुद्दीन शाह, टी. एम. कृष्णा यांनीही हा परिस्थितीविरुद्ध आवाज उठविला. मात्र त्यांना धमक्‍या मिळाल्या. फक्त महाराष्ट्रात हे सुरू नाहीये, तर संपूर्ण देशात हीच स्थिती आहे. समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम सुरू आहे, ते मंजूर नाही. जो बोलतो त्याला विरोध केला जातोय. हा संघर्ष कायम सुरू आहे, तो आताही थांबणार नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन आवाज उठविला पाहिजे,’’ असेही त्या म्हणाल्या.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर तीन वर्षांपूर्वी ‘पुरस्कारवापसी’च्या प्रकरणाने देशाचे सांस्कृतिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या संपूर्ण घटनाक्रमात नयनतारा सहगल यांनी साहित्य अकादमीकडे पुरस्कार परत पाठवणे, याची खूप चर्चा झाली होती. साहित्य अकादमीने त्यांच्या ‘पुरस्कारवापसी’वर केलेले वादग्रस्त विधानही चांगलेच गाजले होते. कलबुर्गी, दाभोलकर, पानसरे यांच्या हत्या आणि रोहित वेमुला याच्या आत्महत्येवरून उठलेले वादळ ‘पुरस्कारवापसी’च्या घटनेला कारणीभूत ठरले होते. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. महेश एलकुंचवार यांनी नयनतारा सहगल यांच्या ‘पुरस्कारवापसी’च्या घटनेवरून साहित्य अकादमी आणि सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती.

विरोधकांचा ‘यू टर्न’
नयनतारा सहगल यांच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन होण्याला विरोध करणाऱ्या मनसेपाठोपाठ शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार यांनीही ‘यू टर्न’ घेतला. सुरवातीला ‘मनसे’ने नयनतारा सहगल यांच्या हस्ते उद्‌घाटन होणे, हा मराठी साहित्यिकांचा अपमान आहे, अशी भूमिका घेतली होती. वाद उपस्थित झाल्यावर त्यांनी सहगल यांना संरक्षण देण्याची भूमिका घेतली. त्याचप्रमाणे सहगल यांच्या नावाला सर्वांत पहिला विरोध करणारे देवानंद पवार यांनी आता आयोजकांवर खापर फोडले आहे. सहगल यांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता, असे सांगत आयोजकांनी सहगल यांचा अपमान केला आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

संयुक्त बैठकीत निर्णय
नयनतारा सहगल यांच्याविरोधातील वातावरण बघून यजमान वि. भि. कोलते वाचनालय, विदर्भ साहित्य संघ- यवतमाळ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत यजमान संस्थेने परिस्थिती मांडून सुरक्षेच्या संदर्भात चिंता व्यक्त केली. यजमानांनी सुरक्षेच्या कारणावरून हात वर केले आणि नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यासंदर्भात तिन्ही संस्थांची सहमती झाली, अशी माहिती आयोजन समितीतील एका पदाधिकाऱ्याने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com