स्वातंत्र्यप्राप्तीपासून गावात एसटी नाही; विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे उपोषण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

स्वातंत्र्यप्राप्तीपासून गावात एसटी बस पोहोचलेली नाही. अशा परिस्थितीत गावकरी व विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या समस्यांचे निराकरण व्हावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह उमरा ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर २२ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

संग्रामपूर(बुलढाणा): तालुक्यातील उमरा ते बावनबीरपर्यंतच्या डांबरी रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. त्यातच स्वातंत्र्यप्राप्तीपासून गावात एसटी बस पोहोचलेली नाही. अशा परिस्थितीत गावकरी व विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या समस्यांचे निराकरण व्हावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह उमरा ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर २२ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

उमरा येथील ग्रामपंचायत भवन २०१५ च्या वादळात उडाले. त्याची दुरुस्ती आजपर्यंत झाली नाही. ग्रामपंचायत भवनच नसल्याने गावकऱ्यांच्या समस्येत भर पडली आहे. या सर्व संकटांमधून बाहेर काढण्यासाठी सरपंच संतोष हागे, गणेश डाबरे, पंजाबराव देशमुख, श्रीराम भोंडे, रामभाऊ गाडगे, श्रीराम अंबळकार, अतुल मेहेरे यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. दरम्यान, जि.प. बांधकाम विभागाचे उपअभियंता ढवळे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. २४ जानेवारीपासून उमरा ते बावनबीर रस्त्यावर कच्चा मुरुम टाकून खड्डे भरण्यात येतील, रस्त्याच्या लांबी वाढविण्यात येईल, असे लेखी आश्वासन ढवळे यांनी दिले. रस्त्याची तात्पुरती मागणी मान्य झाली असली तरी अन्य मागण्यांसाठी उपोषण सुरुच ठेवण्यात आले आहे.  

काँग्रेसचे संजय ढगे, राजू राठोड, राजेश्वर देशमुख, तर भारिपचे आ.तु. वसुलकार, स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर, रोशन देशमुख, प्रकाश मेहेंगे यांनी उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दिला. 
 

Web Title: esakal marathi news buldhana news