मलकापूर: बस चालवून आ.संचेती यांचा स्टंट

श्रीधर ढगे
मंगळवार, 23 जानेवारी 2018

मलकापूर(बुलढाणा): प्रसिद्धी करता राजकीय नेते कधी काय करतील याचा नेम नसतो. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी आणून दिला. गावात बसफेरी सुरू झाल्यावर आमदार महोदयांनी चक्क 'स्टेअरिंग' चा ताबा घेत बस चालविली. त्यांच्या, या धोकादायक स्टंटने प्रवासी व नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचे जराही भान आमदारांनी ठेवले नाही.

मलकापूर(बुलढाणा): प्रसिद्धी करता राजकीय नेते कधी काय करतील याचा नेम नसतो. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी आणून दिला. गावात बसफेरी सुरू झाल्यावर आमदार महोदयांनी चक्क 'स्टेअरिंग' चा ताबा घेत बस चालविली. त्यांच्या, या धोकादायक स्टंटने प्रवासी व नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचे जराही भान आमदारांनी ठेवले नाही.

मलकापूर विधानसभा मतदार संघात चार टर्म चैनसुख संचेती आमदार आहेत. 'अर्थपूर्ण राजकारण' हे यामागचे गमक असल्याचे लोक उघडपणे बोलतात. खराब रस्ते ही स्पर्धा घेतली तर मलकापूर राज्यातील नंबर वन मतदार संघ ठरेल असाही आरोप होतो, तशी टीका विरोधक नेहमीच करतात. याच मतदार संघातील निमगाव ते दादगाव या रस्त्याची प्रचंड झाली होती.त्यामुळेच गावात बस सुद्धा जात नसे. परिणामी विद्यार्थी व ग्रामस्थ त्रस्त होते. या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आता करण्यात आले. त्यानंतर गावात बस फेरीचा शुभारंभ झाला. यावेळी खूप काही केल्याचा मोह आमदार चैनसुख संचेती यांना आवरता आला नाही. त्यांनी स्वतः बसचा ताबा घेतला. चालकाने आधी नकार दिला पण शेवटी 'आले आमदारांच्या मना तेथे कुणाचे चालेना' या प्रमाणे त्यांनी बस ताब्यात घेतली. आमदार संचेती यांनी बस चालवत गावात सिनेस्टाईल एन्ट्री मारली. बसमध्ये प्रवासी होते. तर आमदार सारथी झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा लोक कुतूहलाने उभे होते. थोडीशी गडबड त्यांचा जिवावर बेतली असती, म्हणून आमदारांनी बस चालविणे सुरू केल्यावर चालक त्यांच्या बाजूलाच उभा राहिला. सुदैवाने काही विपरीत घडले नाही. बस चालवण्यासाठी प्रशिक्षण घेतलेले चालक लागतात, आमदार चैनसुख संचेती यांना चारचाकी वाहन चालविणे जमत असेलही पण बस चालविणे हा धोक्याचा स्टंटच होता हे नाकारता येणार नाही. तरीही गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता आणि बसफेरीची मागणी पूर्ण झाली म्हणून गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.

साहेब आमच्याही गावात या...
आमदार बस चालवीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र त्याला पसंती पेक्षा नाराजीचा सूर जास्त उमटत आहे. साहेब आमच्या गावात या 'रस्ता दुरुस्ती करा, बस पण सुरू करा ' अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: esakal marathi news mla bus driving sancheti malkapur