राज्य आर्थिक दिवाळखोरीत - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक़्रमात ते शनिवारी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ उपस्थित होत्या. 

चंद्रपूर: शेतकऱ्यांची कर्जमाफी दिवाळीपूर्वी होणार नाही. ती जाणीवपूर्वक टाळली जात आहे. राज्याची आर्थिक दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू झाली आहे. कर्ज साडेचार लाख कोटींच्या घरात गेले. आणखी दोन वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटून जाईल, असे भाकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक़्रमात ते शनिवारी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ उपस्थित होत्या. 

शिवसेनेने भाजपची साथ सोडली; तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पाठिंबा देईल, अशी चर्चा जाणीवपूर्वक पसरविली जात आहे. मात्र, आम्ही धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणारे आहोत. त्यामुळे भाजपसोबत जाण्याचा प्रश्‍नच येत नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आधीच स्पष्ट केले आहे. 

भाजप सेनेला अपमानास्पद वागणूक देते. मात्र, सेनेला सत्ता सोडवत नाही. बाळासाहेब ठाकरे आज असते; तर सत्तेला लाथ मारली असती, असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी आणि त्यांच्या नेत्यांविषयी याआधीही समाजात गैरसमज आणि अफवा पसरविण्यात आल्या. मी जलसंपदामंत्री असताना सिंचन वाढले होते. भाजप सरकारने ते कमी झाल्याचे सांगितले. मात्र, चितळे समितीच्या अहवालात ते वाढल्याचे म्हटले आहे. श्‍वेतपत्रिकेतही याचा उल्लेख आहे. विद्यमान अर्थमंत्र्यांनी राज्य सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल तीनवेळा मांडला. त्यात सिंचन क्षेत्राचा उल्लेख मात्र टाळण्यात आला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आता कीटकनाशकांनी होत आहेत. बाजारात कीटकनाशक आहे की माणसे मारणारे औषध, याची तपासणी करायला सरकारकडे वेळ नाही. शासनाला बुलेट ट्रेनची घाई झाली आहे. आधी आहेत ती रेल्वेसेवा दुरुस्त करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. नोटाबंदी अपयशी ठरली, काळा पैसा बाहेर आला नाही. दहशतवाद थांबला नाही. महागाई वाढली आहे, अशा शब्दांत केंद्र सरकारवर त्यांनी ताशेरे ओढले. 

Web Title: esakal news economic crises in state says ajit pawar