आत्महत्याग्रस्त कुटुंब अजूनही शासकीय योजनांपासून कोसोदूर

वीरेंद्रसिह राजपूत
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

सदर आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आतापर्यंत शासनाकडून एक लाख मदतीचा निधी काही दिवसांपूर्वी देण्यात आला असला तरी इतर कोणत्याही योजनेसाठी त्यांना बसविण्याची साधी तसदीही प्रशासनाने आतापर्यंत घेतलेली नाही.

नांदुरा - तालुक्यातील मालेगाव गोंड येथील प्रल्हाद विजय खोद्रे या शेतकऱ्याने सततची नापिकी,दुष्काळ त्यातच बँकेच्या कर्जाचा डोंगर व त्यामुळे आलेल्या निराशेपोटी ऐन होळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच दि.११मार्च२०१७ ला आपल्या राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्याकडे साडेचार एकर कोरडवाहू जमीन असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा व त्यातच बँकांचे कर्ज फेडायचे तरी कसे या विवंचनेत ते सापडले होते. मागील दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्याकडे कोरडवाहू शेती असल्याने ही शेती बागायती व्हावी यासाठी प्रशासनाकडे सिंचन विहिरींसाठी अर्ज सादर केला होता. विहीर मिळेल व त्यातून बागायती शेतीतून कुटुंबाला आधार मिळून कुडामातीच्या घराचीही दशा पालटेल या भोळ्या आशेतून हा अर्ज केला होता. मात्र यातूनही त्यांचा भ्रमनिरास झाला होता.

सदर आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आतापर्यंत शासनाकडून एक लाख मदतीचा निधी काही दिवसांपूर्वी देण्यात आला असला तरी इतर कोणत्याही योजनेसाठी त्यांना बसविण्याची साधी तसदीही प्रशासनाने आतापर्यंत घेतलेली नाही. वास्तविक पाहता शासनाकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचवावा यासाठी नरेंगाच्या माध्यमातून विहीर व तत्सम विविध प्रकारच्या योजना प्राधान्याने द्याव्या अशा प्रशासनाच्या सक्त सूचना असताना या कुटुंबाने दोन वर्षांपूर्वी विहिरीसाठी अर्ज केला असतानाही प्राधान्य असूनही त्यांच्या अर्जाचा आतापर्यंत साधा विचारही केला गेला नाही. सध्या हे आत्महत्याग्रस्त कुटुंब हे कुडामातीच्या घरात वास करीत आहे. घरकुलसाठीही अर्ज सादर केला आहे.  प्रपत्र ब च्या यादीत नाव असल्याने ही यादीच लागली नसल्याने  ते ह्या घरकुलसाठीही पात्र ठरलेले नाही.कोणत्याच योजनेचा लाभ त्यांना मिळत नसल्याने त्यांनी प्राधान्याने आम्हाला लाभ देण्यात यावा यासाठी तहसील व पंचायत समितीचे उंबरठे आतापर्यंत झिजविले. मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन अधिकारी व कर्मचार्यांनी हाकलून लावले आहे.

आत्महत्याग्रस्त कुटुंबाना सन्मानाची वागणूक देऊन त्यांना पात्रतेनुसार योजना देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न व्हावेत ही सार्थ अपेक्षा असताना  त्या कुटुंबाना विनाकारण मनस्ताप दिला जात असल्याची खंत यावेळी कुटुंबाकडून ऐकावयास मिळाली.यासाठी शासनाने सर्वच आत्महत्याग्रस्त कुटूंबाना प्राधान्याने योजनांचे वाटप करावे अशी मागणी आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडून सध्या होत आहे.

Web Title: esakal news farmers family struggle for help fro government