निवडणुकीनंतरही राणा व नानाची जोडी सोबतच

श्रीधर ढगे
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

-स्‍थानिक निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
-काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार काय?
-खामगाव मतदारसंघात चर्चा

खामगाव ः विधानसभा निवडणुकीत सत्‍ताधारी भारतीय जनता पार्टीला काँग्रेसकडून काट्याची टक्‍कर देणारी राणा आणि नानाची जोडी निवडणूक निकालानंतरही टिकून आहे. मतदारासंघात मोर्चे बांधणी करून आगामी स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुकीसाठी ही जोडी आतापासूनच तयारीला लागली असल्‍याचे कळते. त्‍यामुळे खामगाव मतदारसंघात काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार काय? अशी चर्चा रंगत आहे.

नुकत्‍याच पार पडलेल्‍या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी माघार घेतल्‍यामुळे अर्ज दाखल करण्याच्‍या शेवटच्‍या दिवशी पक्षाने एबी फॉर्म पाठवून ज्ञानेश्‍वरदादा पाटील यांना उमेदवारी दिली.

त्‍यानंतर राणा आणि नाना या दोन शक्‍ती एकत्र आल्‍या आणि विद्यमान आमदार ॲड. आकाश फुंडकर यांना त्‍यांनी काट्याची लढत दिली. ऐनवेळी उमेदवारी मिळाल्‍यावरही पाटील यांनी 73 हजार मते घेतली. फुंडकरांना 40 ते 50 हजारांचा लिड अपेक्षित होता. मात्र, त्‍यांना 16 हजारावर समाधान मानावे लागले. पाच वर्षापूर्वी खामगाव मतदारसंघात दिलीपकुमार सानंदा यांनी एकहाती सत्‍ता ठेवली होती. मात्र, त्‍यानंतर आकाश फुंडकर आमदार झाले आणि त्‍यांनी सर्वच स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था भाजपच्‍या ताब्‍यात घेतल्‍या.

विधानसभा निवडणूक एक वर्षावर असताना कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे निधन झाले. हा फुंडकर परिवार व भाजपसाठी मोठा धक्‍का होता. त्‍यातून सावरत फुंडकरांनी या निवडणुकीत राणा आणि नानाच्‍या जोडीला टक्‍कर देत विजय खेचून आणला. मात्र, सानंदांनी माघार घेतल्‍याने एकतर्फी असलेली निवडणूक ऐनवेळी अटीतटीची झाल्‍याने भाजपला जास्‍त कष्ट घ्यावे लागले.

राजकारणात कोणत्‍या क्षणाला काय होईल याचा नेम नसतो, हा प्रत्‍यय खामगावात सुध्दा आला. सत्‍ता हातात असताना बऱ्याच गोष्टीत लोकांची नाराजी लवकर कळत नाही त्‍याचा फायदा विरोधक घेत असतात. त्‍यामुळे सत्‍ताधारी पक्षाने अधिक सजग असणे गरजेचे आहे. हेच खामगाव मतदारसंघातील तसेच राज्‍यातील निवडणूक निकालातून यावेळी स्‍पष्ट झाले. त्‍यामुळे आता खामगाव मतदारसंघातील आगामी काळात स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमध्ये अटीतटीच्‍या लढती होतील अशी शक्‍यता आहे. 

पुन्हा रंगणार सानंदा आणि फुंडकर सामना
सध्या लगेचच कोणतीही निवडणूक नसली तरी दोन अडीच वर्षांनी स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुका होतील, त्‍यामध्ये पुन्‍हा सानंदा आणि फुंडकर हा राजकीय सामना रंगणार आहे. या सामन्‍यात आता ज्ञानेश्‍वर पाटील हे नवीन खिलाडी सुध्दा सहभागी झाले आहेत. राणा आणि नानाच्‍या जोडीने पक्षाची बांधणी नव्‍याने सुरू केली असून, ही जोडी कितपत यशस्‍वी होते हे मात्र येणारा काळच सांगणार आहे.

एका म्यानमध्ये दोन तलवारी; तरी जोडी टिकली
एका म्‍यानमध्ये दोन तलवारी राहु शकत नाहीत, अशी आख्यायिका सर्वश्रृत आहे. त्‍यामुळे राणा आणि नानाची जोडी निवडणूक काळातच टिकते की नाही, अशी शंका अनेकांना होती. मात्र, या जोडीने एकमेकांची साथ सोडली नाही. विधानसभेनंतर ज्ञानेश्‍वर पाटील खामगाव मतदारसंघात फिरतांना दिसत आहेत. त्‍यांच्‍यासोबत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे सुध्दा असतात. त्‍यामुळे निवडणुकीनंतरही राणा आणि नानाची जोडी टिकलेली असून, कार्यकर्ते सुध्दा त्‍याचे समाधान मानतांना दिसतात. 

सत्ता येण्याचे संकेत असल्याने उत्साह
भाजप-शिवसेना युती निवडणुकीनंतर तुटली असून, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सत्ता स्थापन करण्याबाबत मंथन सुरू आहे. भाजप सत्तेत राहणार नाही आणि नव्याने अस्तित्वात आलेली महाआघाडी सत्तेत येईल अशी शक्यता आहे. अनपेक्षित असलेला सत्तेचा वाटा मिळणार असल्याने काँगेसमध्ये आनंदाची लहर निर्माण झालेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even after the election, Rana and Nana accompany the pair