"एव्हरेस्ट' झाले; आता "ऑलम्पिक' लक्ष्य!

file photo
file photo

चंद्रपूर : ऑलम्पिक पदकाला गवसणी घालण्यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन,वन आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या मिशन शक्ती या अभियानाचा शुभारंभ उद्या, रविवारी सिने अभिनेते आमिर खान यांच्या उपस्थित होणार आहे. यावेळी मुनगंटीवार यांच्यासह क्रीडामंत्री आशिष शेलार उपस्थित असतील. यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना सन 2024 च्या ऑलम्पिकमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल.
"मिशन शौर्य' अंतर्गत जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले. चंद्रपूर व महाराष्ट्राचा झेंडा फडकवला. सुप्त गुणांना संधी मिळाली आणि योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या तर येथील खेळाडू मोठी कामगिरी करून दाखवू शकतात, असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात निर्माण झाला. म्हणून "मिशन शक्ती' ही योजना राबवून ऑलिंपिक स्पर्धेकरिता खेळाडू तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. या अभियानाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, मूल, पोंभूर्णा व चिमूर तालुक्‍यात क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. 15 ते 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासीबहुल क्षेत्रातील मुला-मुलींचा यात प्रामुख्याने समावेश असेल. शालेय विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावर खेळांमध्ये प्रावीण्य प्राप्त केले असेल, अशा विद्यार्थ्यांची निवड "मिशन शक्ती' करिता करण्यात येणार आहे.
सात खेळांचा समावेश
"मिशन शक्ती'च्या माध्यमातून क्रीडा संकुलामध्ये वेटलिफ्टिंग, धनुर्विद्या, नेमबाजी, जलतरण, ऍथलेटिक्‍स, व्हॉलिबॉल, जिम्नॅस्टिक व बॉक्‍सिंग या सात खेळांचा समावेश करण्यात आला. जागतिक दर्जाचे प्रशिक्षण जिल्ह्यातच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यादृष्टीने विविध अद्ययावत क्रीडा सुविधा पुरवणे, खेळाडूंना दीर्घकालीन व अत्याधुनिक क्रीडा प्रशिक्षण देणे. 2024 च्या ऑलम्पिकमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून प्रावीण्य प्राप्त खेळाडू तयार केलेल्या क्रीडा मार्गदर्शकाची सेवा उपलब्ध करून देणे. नॅशनल इन्स्टिट्‌यूट ऑफ स्पोर्ट या संस्थेतून क्रीडा प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या क्रीडा मार्गदर्शकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com