नागपूरच्या प्रणवने केले सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर

प्रणव बांडबुचे
प्रणव बांडबुचे

नागपूर : येथील युवा गिर्यारोहक प्रणव बांडबुचे याच्यासह 14 जणांच्या चमूने आज सकाळी 8,300 मीटर उंची जगातील सर्वोच्च उंच माउंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करीत नागपूरचा झेंडा रोवला आहे. तीन वर्षांपूर्वी प्रणवने माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेर्पाची तब्बेत बिघडल्याने ते स्वप्न भंगले होते. मात्र, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर दुसऱ्या प्रयत्नात प्रणवने शिखर यशस्वीरीत्या पार केले आहे.
इमॅजिन नेपाळ ट्रेकचे व्यवस्थापकीय संचालक मिनग्मा ग्यालजे शेर्पा यांच्या मार्गदर्शनात सात गिर्यारोहक आणि सात शेर्पाची चमू माउंट एव्हरेस्टवर आज सकाळी पोहोचली. या चमूत प्रणव बांडबुचे हा एकमेव भारतीय गिर्यारोहक आहे. त्याच्यासोबत ग्रीसचे फ्लॅमपौरी ख्रितिना व आर्कोन्टीदो वासिलिकी, चीनचे जिया लिन चांग, लियू यॉंगझॉंग, वॅंग झ्यू फेंग आणि झेंग हूयी वेन, किली पेम्बा शेर्पा, दावा तेनझीन शेर्पा, टॅमटिंग शेर्पा, लक्‍पा तमंग, दावा ग्यालजे शेर्पा, फुर्बा छोतर शेर्पा आणि देंडी शेर्पा यांचा समावेश आहे.
किली पेंम्बा व आर्कोन्टीदो वासिलिकी हे दोघे समीट पॉइंटला सकाळी आठ वाजता पोहोचले तर उर्वरित सर्वांनी सकाळी सात वाजून 15 मिनिटांनी माउंट एव्हरेस्टवर पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर सर्वच गिर्यारोहक कॅम्प चारकडे रवाना झाले.
सीएसी ऑलराउंडर या साहसी संस्थेचा सदस्य असलेला प्रणव हा विदर्भातला युवा गिर्यारोहक आहे. त्याने अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग ऍण्ड अलाइड स्पोर्टस येथून गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले. तांत्रिकदृष्ट्या अतिशय अवघड असे हनुमान तिब्बा हे शिखर पार करणारा प्रणय हा पहिलाच नागपूरकर आहे. माउंट देव तिब्बा, माउंट शितीधर आणि युरोपातील सर्वाधिक उंच शिखर माउंट एल्ब्रसवरदेखील त्याने भारताचे निशाण फडकावले आहे.
प्रणय सायकलिंगचीदेखील आवड आहे. त्याने 200 आणि 300 किलोमीटरची ब्रेव्हेटदेखील पूर्ण केली आहे. एव्हरेस्ट मोहिमेसाठी लागणारी शारीरिक तयारी त्याने डॉ. अमित समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली केली. कुटुंबात आई व लहान भाऊ, बहीण असलेल्या प्रणवचे कुटुंब शेतकरी आहे.
इमॅजिन नेपालची चमू सोमवारी माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी पहिली चमू ठरली, असे बेस कॅम्पचे लायसग्यानेंद्र श्रेष्ठा यांनी कळविले आहे. माउंट एव्हरेस्ट समीटचा मार्ग पुढच्या तीन ते चार दिवसांसाठी खुला राहणार आहे. सुमारे दोनशे गिर्यारोहक या काळात माउंट एव्हरेस्टवर पोहोचण्याचा प्रयत्न करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com