शेतशिवारात पसरली स्मशानशांतता; अवकाळीचा फटका 

सूरज पाटील 
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

घराघरांत दिवाळीच्या उत्सवाची धामधूम सुरू असताना अवकाळी पावसाने कहरच केला. एका क्षणात बळीराजासह त्याच्या कुटुंबाच्या स्वप्नावर पाणी फेरले. कापूस, सोयाबीन, भाजीपाला आदी पिकांची माती केली. शेतकऱ्यांचे सर्व आर्थिक गणित खरीप हंगामातील पिकावर अवलंबून असते. उभे पीक पाण्यात गेलेले विदारक चित्र बघण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

यवतमाळ : पावसाळ्यात दडी मारलेल्या पावसाने अवकाळीत रौद्ररूप धारण करून पिकांची माती केली. नेमका घास तोंडात आला असताना अवकाळीने तो हिरावून नेला. मातीमोल पिकांकडे बघताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रूंचा पूर दाटून येत आहे. आता तर शेतशिवाराकडे पाय टाकण्याचे धाडस शेतकऱ्यांमध्ये उरले नाही. त्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर चिंता अन्‌ शेतशिवारात स्मशानशांततेचे चित्र बघावयास मिळत आहे. 

घराघरांत दिवाळीच्या उत्सवाची धामधूम सुरू असताना अवकाळी पावसाने कहरच केला. एका क्षणात बळीराजासह त्याच्या कुटुंबाच्या स्वप्नावर पाणी फेरले. कापूस, सोयाबीन, भाजीपाला आदी पिकांची माती केली. शेतकऱ्यांचे सर्व आर्थिक गणित खरीप हंगामातील पिकावर अवलंबून असते. उभे पीक पाण्यात गेलेले विदारक चित्र बघण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाळ्यात रूसलेल्या पावसाने अवकाळी रौद्ररूप धारण केले आहे. आठवडाभर सातत्याने विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अश्रूंची त्यात भर पडली.

घरात विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या सोयाबीनवर बुरशी चढली. काढणीच्या प्रतीक्षेतील सोयाबीनला कोंब फुटले. तर, सोयाबीनची बोंड सडायला लागली. गेल्या पाच वर्षांपासून एकही हंगाम साथ देत नाही. कधी ओला, तर कधी कोरडा दुष्काळ पाचवीलाच पुजला आहे. त्यात अवकाळीने कहरच केला. हातातोंडाशी आलेला घास पुरता हिसकावून नेला. 

रिणामी कर्जाचा बोजा आणखी वाढला आहे. सराफाकडे गहाण ठेवलेले दागिने सोडवायचे कसे, सावकाराचे कर्ज फेडायचे कसे आणि कुटुंबाला जगवायचे कसे, असे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. महसूल प्रशासनाने पंचनामा करण्याचे आदेश देताच, कृषी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शासकीय सोपस्कार पार पाडायला सुरुवात केली. नेत्यांनी पिकांची पाहणी करून नेहमीप्रमाणे धीर दिला. आता मात्र, शेतकरी शेतशिवारात जाण्यास धजावताना दिसत नाही. 

आता आश्‍वासनांचा पाऊस 
रक्ताचे पाणी करून बहरलेल्या पिकांची माती झालेली बघून शेतकऱ्यांची अवस्था गलितगात्र झाली आहे. नेतेमंडळी पिकांची पाहणी करून मदतीचे आश्‍वासनांचा पाऊस पाडत आहे. लाखोंचे नुकसान आणि हजारांत मिळणारी मदत, यात विस्कटलेली घडी, बसणारच कशी याचे उत्तर सध्या कुणाकडेही नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Every where calm and quite due to rain