दरवर्षी 5300 दशलक्ष टन माती जाते वाहून!

अनुप ताले
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

  • जमिनीची धूप होण्याचे प्रमाण प्रचंड
  • सेंद्रिय कर्बाअभावी सुपिकताही होतेय नष्ट
  • रासायनिक खतांचा अति वापर व वारंवार पीक पद्धीती धोक्याची
  • सुरक्षित भविष्यासाठी तत्काळ उपाययोजनांची गरज

अकोला : वृक्षतोड, व्यवस्थापन विरहित पाण्याचा वापर, जमिनीत रासायनिक पदार्थांचा अती व सेंद्रिय पदार्थांचा अत्यल्प वापर, अतिमशागत, वारंवार व बारमाही पीक पद्धती आणि कमी वेळेत अधिक पाऊस पडून जमितीची प्रंचड धूप होत असल्याने, महाराष्ट्र व लगतच्या परिसरातून सुमारे पाच हजार 300 दशलक्ष टन माती दरवर्षी बंगालच्या उपसागरात वाहून जात आहे. जमिनीतील ‘सेंद्रिय कर्ब’ सुद्धा कमी झाल्याने, जमिनीची सुपिकता झपाट्याने नष्ट होत असून, मानवी भविष्याच्या सुरक्षेसाठी ती टिकवने अत्यावश्यक झाले आहे.

लोकसंख्या वाढीसोबतच अन्नधान्य निमिर्तीची गरजही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जमिनीत विविध रासायनिक घटकांचा वापर करून अधिकाधिक उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असून, जमीन बाराही महिनी पिकांखाली राहात आहे. वारंवार पीक पद्धतीचा अवलंब होत आहे. यामुळे नत्र, स्फुरद, पालाश, सुक्ष्म अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये कमी होत आहेत. जमिनीची सुपिकता, मातीचा थर टिकून ठेवण्यासाठीचे प्रयत्न होत नसल्याने, प्रचंड माती पाण्याद्वारे वाहून जात आहे तर, उरलेली जमीन पोषक घटकांचा ऱ्हास झाल्याने अकृषक होत आहे. यावर उपाय म्हणजे, हिरवळीचे खते, हिरवळीचे खते देणारी झाडे शेतात लावणे. संतूलीत खतांच वापर, विविध सेंद्रिय खते तयार करणाऱ्या पद्धतींचा अवलंब, आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

‘जमिनीची धूप थांबवा, भविष्य वाचवा’
जमिनीतील पोषक तत्व अन्नधान्याच्या माध्यमातून मानवाला मिळतात. त्यामुळे भविष्याच्या सुरक्षेसाठी मानवाला जमिनीची सुपिकता टिकवणे आवश्यक बनले आहे. याच विचारधारेतून यावर्षी युनायटेन नेशनद्वारे, जमिनीच्या सुधारणेसाठी ‘जमिनीची धूप थांबवा, भविष्य वाचवा’ ही थीम ठेवली आहे.

रासायनिक खतांचा अतिवापर ठरतोय विनाशक
सेंद्रिय खताची उपलब्धता पर्याप्त मात्रेत व वेळेत होत नसल्याने, शेतकरी रासायनिक खतांचा वापर करत आहेत. त्यातही अधिक उत्पादन मिळविण्यासाठी या खतांचा (डीएपी, युरीया) अती वापर होत आहे. त्यामुळे जमिनीच्या 10 सेंमी खालचा थर दिवसेंदिवस कडक होत असून, त्यामुळे पडणारा पाऊस या 10 सेंमी खाली झिरपत नाही. त्यामुळे जमिनीला भेगा पडून कडकपणा वाढत आहे आणि सुपिकता नष्ट होऊन जमीन अकृषक होत आहे.

माती परीक्षण करणे आवश्यक
जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी किमान तीन वर्षातून जमिनीचे परीक्षण करावे, सेंद्रिय कर्ब, खनिजे तपासून नियोजन करावे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय पदार्थांचा अवलंब वाढविणे गरजेचे असून, पिकांचा अवशेष खत करून तो शेतात वापरावा. दरवर्षी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सुमारे पावने तीन हजार शेतकरी माती परीक्षण करतात, हा आकडा अजून वाढणे गरजेचे आहे.
- डॉ.प्रकाश कडू, विभाग प्रमुख,
कृषी रसायन व मृदशास्त्र विभाग, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

शेतातील अवशेष शेतातच गाळावे
दरवर्षी 5300 दशलक्ष टन माती वाहून जाते. जमिनीची ही धूप थांबविण्यासाठी सेंद्रिय कर्ब टिकविणे आणि वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील पिकांच्या अवशेषांचे खत करून किंवा ते जसेच्या तसे जमिनीत गाळावे. जमिनीच्या बांधावर जिरेपुष्प, शेवरी यासारखे झाडे लावून त्यांचा पाला जमिनीत टाकावा. यामुळे जमिनीची सच्छिद्रता, सुपिकता वाढेल, पाणी मुरेल आणि जमिनीची धूप थांबेल.
- डॉ.एन.एम. कोंडे, साहाय्यक प्राध्यापक, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

हजार वर्षात बनतो 2.5 सेंमी मातीचा थर
शास्त्रज्ञांच्या मते, सर्वसाधारणपणे 2.5 सेंमी जाडीचा मातीचा थर तयार होण्यास सुमारे 400 ते एक हजार वर्षांचा काळ लागतो तर, 30 सेंमी थर तयार होण्यास सुमारे सहा हजार वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे दरवर्षी सुमारे साडेपाच हजार दशलक्ष टन माती समुद्रात वाहून जाणे चिंतेचा बाब असून, त्यासाठी तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Every year, 5300 million tons of soil is transported