ईव्हीएममध्ये सर्वत्र बिघाड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

व्हीव्हीपीटीतील बिघाड... 
276  - पालघर 
100  - गोंदिया 

मतदान टक्केवारी 
पालघर : 46.5 
भंडारा- गोंदिया : 45 
निकाल : 31 मे 

भंडारा/पालघर - भंडारा-गोंदिया आणि पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आज अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन बंद पडल्याने मतदानाची प्रक्रिया खोळंबली. ईव्हीएममधील बिघाडानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना बंद मशिनच्या दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांची दमछाक झाली. पालघर मतदारसंघात तब्बल 276 व्हीव्हीपीएटी मशिनमध्ये बिघाड झाल्याने मतदार; तसेच निवडणूक यंत्रणांमध्ये दिवसभर गोंधळाचे वातावरण होते. 

भंडारा-गोंदियामध्ये पोटनिवडणुकीसाठी सकाळी सात वाजता मतदानाला सुरवात झाल्यानंतर एका तासातच वेगवेगळ्या ठिकाणांहून मशिन बंद पडण्याचे प्रकार सुरू झाले. तुमसर तालुक्‍यातील खरबी येथील मतदान केंद्र क्रमांक 233 व 234 मध्ये मशिन बंद पडली. सकाळी नऊपर्यंत लाखनी तालुक्‍यात मुरमाडी येथील बूथ क्रमांक 124, पवनी तालुक्‍यातील सिंदपुरी, रुयाळ, भंडारा तालुक्‍यातील खोकरला मतदान केंद्र क्रमांक 27 येथील मशिन बंद पडले. याबाबत केंद्रप्रमुखांनी संबंधित तहसीलदारांकडे तक्रार नोंदवली. यानंतर लाखांदूर तालुक्‍यातील किन्हाळा, मोहरना, डोकेसरांडी, लाखांदूर, खैरना येथील यंत्रात बिघाड झाला. मशिन दुरुस्तीसाठी तालुक्‍याच्या ठिकाणाहून अभियंते व संबंधित अधिकाऱ्यांना त्या-त्या ठिकाणी पाठविण्यात आले. गोसेखुर्द प्रकल्पबाधित 32 गावांतील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. 

पवनी तालुक्‍यातील वलनी येथे केंद्र क्रमांक 428वर सव्वानऊ वाजता; तसेच 429 क्रमांकाच्या केंद्रावर पावणेदहा वाजता मशिन बंद पडली. मतदान संपण्याच्या वेळेपर्यंत ही स्थिती कायम होती. केंद्राध्यक्ष बी. बी. भिवगडे यांनी तक्रार करूनही दुसरे मशिन मिळाले नाही. 

साकोली तालुक्‍यात 37 केंद्रांवर मशिन बंद पडले; तसेच लाखांदूर व लाखनी तालुक्‍यात प्रत्येकी 30-30 केंद्रांवर ईव्हीएम बंद पडले. रांगेत असलेल्या सगळ्यांना मतदान करता आले. गोंदिया जिल्ह्यात शंभरापेक्षा अधिक मतदान यंत्रांत बिघाड निर्माण झाल्याची माहिती आहे. यामुळे अनेक ठिकाणी मतदारांनी मतदान न करता घरी जाणे पसंत केले. 

पालघरमध्येही तेच... 
पालघर मतदारसंघात व्हीव्हीपॅट मशिनमध्ये सकाळी मॉक पोल केल्यापासून तांत्रिक बिघाड झाल्याचे, एरर येत असल्याचे निदर्शनास आले. 2097 केंद्रांसाठी जिल्ह्याकडे 2608 व्हीव्हीपॅट मशिन आली होती. पालघर मतदारसंघात 276 व्हीव्हीपॅट मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समजले. बिघाड झालेल्या केंद्रांवर तंत्रज्ञांना नेऊन मशिन बदलणे हाच पर्याय होता. मात्र झोनल अधिकाऱ्यांकडे व्हीव्हीपॅट मशिनचा मर्यादित साठा असल्याने मतदान पुन्हा सुरू होण्यास विलंब झाला. यामुळे यापैकी अनेक ठिकाणी मतदारांना एक ते तीन तास ताटकळत राहावे लागले; तर काही ठिकाणी मतदारांनी घरी परतणे पसंत केले. 

मतपत्रिकाच वापरा - शिवसेना 
शिवसेनेने यापुढील होणारे सर्व मतदान हे पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेद्वारे करण्यात यावे, अशी मागणी केली आहे; तर ज्या ठिकाणी व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बिघाड झाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष झालेल्या व्हीव्हीपॅटच्या मतांची मतमोजणी करण्यात व्हावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीने केली आहे. 

व्हीव्हीपीटीतील बिघाड... 
276  - पालघर 
100  - गोंदिया 

मतदान टक्केवारी 
पालघर : 46.5 
भंडारा- गोंदिया : 45 
निकाल : 31 मे 

रिंगणातील उमेदवार 
नाना पटोले यांनी राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने भंडारा- गोंदिया आणि भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झाले. पालघरमध्ये सात उमेदवार रिंगणात असले तरी, मुख्य चुरस शिवसेनेचे श्रीनिवास वनगा आणि भाजपचे राजेंद्र गावित यांच्यात असणार आहे, तर भंडारा-गोंदियामध्ये तब्बल 18 उमेदवार रिंगणात असून, राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे आणि भाजपचे हेमंत पटेल यांच्यात मुख्य लढत असेल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EWM is a failure by-election of Bhandara-Gondiya and Palghar Lok Sabha Constituency