महाजनादेश यात्रेवर उत्साहाचा पाऊस

छत्रपती चौक ः जनादेश यात्रेदरम्यान आकाशात फुगे उडविताना विशेष रथावर आरूढ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शेजारी रथावर चढण्याचा प्रयत्न करताना आमदार सुधाकर कोहळे.
छत्रपती चौक ः जनादेश यात्रेदरम्यान आकाशात फुगे उडविताना विशेष रथावर आरूढ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शेजारी रथावर चढण्याचा प्रयत्न करताना आमदार सुधाकर कोहळे.

नागपूर  ः गुरुकुंज मोझरी येथून सुरू झालेली भाजपची महाजनादेश यात्रा आज नागपुरात पोहोचली. भरपावसात जनादेश यात्रेच्या स्वागतासाठी संपूर्ण शहरातून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी चिंचभवन गाठले. चिंचभवन ते व्हेरायटी चौकापर्यंत ठिकठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उत्साही कार्यकर्त्यांनी फुलांची "बरसात' करीत स्वागत केले. रस्त्याच्या एका बाजूला चाहत्यांच्या रांगेमुळे जणू मोठी मानवी साखळीच यानिमित्त तयार झाल्याचे चित्र निर्माण झाले.महाराष्ट्रात पुन्हा सत्ता काबीज करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा सुरू केली. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत नागरिकांना ते पुन्हा जनादेशाचे आवाहन करीत आहेत. मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा आज शहरात पोहोचली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास भरपावसात जनादेश यात्रा शहराच्या सीमेमध्ये आली. ढोल, ताशा तसेच डीजेच्या जोरदार गजरात यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी शहर भाजप अध्यक्ष प्रवीण दटके, महापौर नंदा जिचकार, सत्तापक्षनेते संदीप जोशी आदी प्रमुख नेते उपस्थित होते. धो-धो पावसातही स्वागत करण्यासाठी आलेले कार्यकर्ते, चाहत्यांनी विशेष अत्याधुनिक रथावरील मुख्यमंत्र्यांना मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी गर्दी केली. भाजपचे झेंडे घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांमुळे संपूर्ण रस्ता भाजपमय झाला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः माईक हातात घेऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. रस्त्याच्या एका बाजूला उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी "मुख्यमंत्री आगे बढो, हम तुम्हारे साथ है', भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशा घोषणा दिल्या. या घोषणांमध्येच जनादेशयात्रा छत्रपती चौकात पोहोचली. येथे दक्षिण नागपूरच्या वतीने आमदार सुधाकर कोहळे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. भाजपचे झेंडे उंचावून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना अभिवादन केले. विशेष रथावर उभे राहून मुख्यमंत्र्यांनीही कार्यकर्त्यांना हात उंचावून पुन्हा सत्तेत येण्यासाठी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले. त्यानंतर जनादेश यात्रेचे स्वागत व्हेरायटी चौकात करण्यात आले.छत्रपती चौकात मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केशरी, हिरव्या रंगाचे फुगे उडवित पुन्हा सत्तेत येण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, मशीनच्या साहाय्याने मुख्यमंत्र्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.मुख्यमंत्र्यांच्या यात्रेतील रथ विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले. सर्व सुविधायुक्त असलेल्या या रथामध्ये लिफ्टचीही सोय होती. रथाच्या टपावर येण्यासाठी मुख्यमंत्री या लिफ्टचा वापर करताना दिसून आले. यात्रेतील इतर रथामध्ये टीव्ही, मोठा एलईडी स्क्रिन लावण्यात आला होता.रथयात्रेनिमित्त वर्धा मार्गावर वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली. चिंचभवन ते हॉटेल प्राईडपर्यंत वाहनांच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. स्वतः मुख्यमंत्री माईक घेऊन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना आवाहन करताना दिसून आले.छत्रपती चौकात मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेचे आभार मानलेच. शिवाय गेल्या पाच वर्षांत शहराला आंतराष्ट्रीय स्तरावर झळकावल्याचे त्यांनी सांगितले. पुढील पाच वर्षांत नागपूर, विदर्भ व महाराष्ट्र देशात सर्वोत्तम करणार, अशी ग्वाही देत त्यांनी आशिर्वाद मागितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com