वलनी तलावात मृत कोंबड्यांचा खच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

हिंगणा (जि.नागपूर)  : तालुक्‍यातील दाभा आगरगाव येथील एका पोल्ट्री फार्ममधील मृत कोंबड्या वलनी तलावात फेकण्यात आल्या. यामुळे तलावातील पाणी प्रदूषित झाले असून बर्ड फ्लू पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी तालुका आरोग्य प्रशासनाकडे याची तक्रार केली आहे. 

हिंगणा (जि.नागपूर)  : तालुक्‍यातील दाभा आगरगाव येथील एका पोल्ट्री फार्ममधील मृत कोंबड्या वलनी तलावात फेकण्यात आल्या. यामुळे तलावातील पाणी प्रदूषित झाले असून बर्ड फ्लू पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी तालुका आरोग्य प्रशासनाकडे याची तक्रार केली आहे. 
दाभा आगरगाव गावाची लोकसंख्या दोन हजारांच्या घरात आहे. गावाशेजारी काळे यांच्या मालकीचे पोल्ट्री फार्म आहे. चार दिवसांपूर्वी पोल्ट्री फार्ममधील शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला. या कोंबड्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली नाही. पोल्ट्री फार्ममधील मृत कोंबड्या जिल्हा परिषद लघुसिंचन अखत्यारीतील वलनी तलावात फेकण्यात आल्या. तसेच काही कोंबड्या दाभा परिसरातील खुल्या जागेवर फेकण्यात आल्या. ही माहिती ग्रामस्थांना मिळताच गावात खळबळ उडाली. 
हिंगणा भाजप तालुकाध्यक्ष विशाल भोसले यांनी या घटनेची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पडवे व पशुधन विकास अधिकारी यांना दिली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून मोका चौकशी केली. पोल्ट्री फार्मवर चौकशीसाठी गेले असता पोल्ट्री फार्मला कुलूप आढळून आले. या प्रकरणाची चौकशी करून संपूर्ण अहवाल प्रशासनाला सादर केला जाणार आहे. कोंबड्या तलावात फेकल्याने पाणीही प्रदूषित झाले आहे. तसेच गावाशेजारीही मृत कोंबड्या फेकल्याने बर्ड फ्लू पसरण्याची दाट शक्‍यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पोल्ट्री फार्म मालकावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी दाभा आगरगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे. 
दाभा आगरगाव परिसरातील पोल्ट्री फार्म संचालकाने मृत कोंबड्याची विल्हेवाट योग्यरीतीने लावली नाही. वृत्त कोंबड्या तलावात व परिसरात फेकल्या. यामुळे रोगराई पसरण्याची शक्‍यता आहे. दोन हजार लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद लघुसिंचन विभागानेही याची तक्रार पोलिस प्रशासनाकडे करावी. तालुका प्रशासनाने याची चौकशी करून तातडीने कार्यवाही करावी. 
रामराव राठोड 
सरपंच 
दाभा-आगरगाव

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expenditure of dead chickens in Valani Pond