काटोल-नरखेडमध्ये अतिवृष्टी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

काटोल /जलालखेडा (जि.नागपूर) : काटोल व नरखेड तालुक्‍यात मंगळवारी रात्री दमदार पाऊस झाला. सहा तास संततधार पावसामुळे अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. काटोल व नरखेड तालुक्‍यात अनुक्रमे 91 व 90 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. दोन्ही तालुक्‍यांतील सर्वच नदीनाले दुथडी भरून वाहू लागले.

काटोल /जलालखेडा (जि.नागपूर) : काटोल व नरखेड तालुक्‍यात मंगळवारी रात्री दमदार पाऊस झाला. सहा तास संततधार पावसामुळे अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. काटोल व नरखेड तालुक्‍यात अनुक्रमे 91 व 90 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. दोन्ही तालुक्‍यांतील सर्वच नदीनाले दुथडी भरून वाहू लागले.
अनेक ठिकाणी पुराचे पाणी ओसरेपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. जलालखेडा नजीकच्या सुमारे चाळीस गावांचा संपर्क तुटला होता. बुधवारी सकाळी शाळा, महाविद्यालये उघडलील मात्र पुरामुळे विद्यार्थी पोहोचू शकले नाहीत. दमदार पावसामुळे शेतकरी आनंदला आहे. दुष्काळग्रस्त काटोल व नरखेड तालुक्‍यात आतापर्यंत दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतातुर होते. मात्र, मंगळवारी शेतकऱ्यांची चिंता काहीअंशी दूर झाली आहे. काटोल तालुक्‍यातील काटोल, येनवा, पारडसिंगा व नरखेड तालुक्‍यातील भिष्णूर मंडळात 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. काटोलमध्ये सर्वाधिक 130 मिमी, त्यापाठोपाठ पारडसिंगा व येनवा सर्कल व नरखेड तालुक्‍यातील भिष्णूर मंडळात पावसाने दमदार हजेरी लावली. तालुक्‍यातून वाहणाऱ्या जाम व मंदार नदीला पूर आला. सर्वच नाले दुथडी भरून वाहून लागले. सकाळी दोन्ही तालुक्‍यांतील नागरिकांनी बुधवारी पूर पाहण्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूला एकच गर्दी केली. भारसिंगीनजीकच्या जाम नदीला आलेल्या पुरामुळे वरुड ते नागपूर मार्ग सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत तीन तास बंद होता. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मार्ग बंद झाल्याने विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात वेळेत पोहोचू शकले नाहीत. जलालखेडा बाजारपेठेशी जोडलेल्या सुमारे 40 गावखेड्यांचा तब्बल चार तास तुटला होता. अनेक ठिकाणी रस्त्यावर व सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक खोळंबल्याची माहिती मिळाली आहे.
नव्या महामार्गामुळे शेती झाली तलाव
वरुड ते काटोल या मार्गाचे नव्या सिमेंटीकरण झाल्यामुळे रस्ता हा आधीपेक्षा खूप उंच झाला आहे. यामुळे शेती रस्त्यापेक्षा सखल झाली आहे. रस्त्यावरून वाहणारे पाणी शेतात शिरल्याने अनेक ठिकाणी शेतीचे रूपांतर तलावात झाले. त्यांचे नुकसान होणार आहे. याशिवाय सखल भागातील शेतीत पाणी साचले आहे. यामुळेदेखील शेतकरी चिंतेत सापडला आहे.
अनेक मार्ग बंद
दमदार पावसामुळे काटोल व नरखेड तालुक्‍यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते बंद झाले होते. अनेक गावांतील नागरिक सकाळी शेतात जाऊ शकले नाहीत. नदीनाल्यांना आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. दोन्ही तालुक्‍यांतील अनेक गावांत वाहतूक खोळंबली होती. अतिवृष्टी व पावसाच्या नुकसानाची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मंडळनिहाय पडलेला पाऊस
काटोल पाऊस नरखेड पाऊस
काटोल 130 नरखेड 93 मिमी
येनवा 118.5 मोवाड 85 मिमी
कोंढाळी 57 जलालखेडा 88.2 मिमी
पारडसिंगा 120 मेंढाला 85.4 मिमी
मेटपांजरा 61.3 सावरगाव 82 मिमी
रिधोरा 65. भिष्णूर 103 मिमी
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extreme rainfall in Katol-Narkhed