पृथ्वीराज चव्हाण यांनीच आघाडीत बिघाडी केली - सुनील तटकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

नागपूर - विधान परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते आघाडी करण्याच्या तयारीत होते; मात्र पृथ्वीराज चव्हाण यांचा विरोध होता. त्यांच्या हट्टामुळेच आघाडीत बिघाड झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.

नागपूर - विधान परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते आघाडी करण्याच्या तयारीत होते; मात्र पृथ्वीराज चव्हाण यांचा विरोध होता. त्यांच्या हट्टामुळेच आघाडीत बिघाड झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.

विधानभवन परिसरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयात दोन्ही सभागृहांतील सदस्यांना मार्गदर्शन करताना तटकरे म्हणाले, की चव्हाण यांच्यामुळेच विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांची आघाडी झाली नाही. याचा परिणाम म्हणून सदस्यसंख्या घटली. विधान परिषदेत आघाडीसाठी दोन्ही पक्षांचे नेते अनुकूल होते; मात्र जास्तीच्या जागा मागून पृथ्वीराज चव्हाण यांनी आडकाठी निर्माण केली. आघाडी झाली तर आपल्या जागा कायम राहिल्या असत्या. नगरपालिका निवडणुकीत स्थानिक स्तरावरील नेत्यांना आघाडीचे करण्याचे अधिकार देण्यात आले होते. यात आपल्याला अपयश आले. एक-दोन निवडणुकांवरून राजकीय पक्षांचे मूल्यमापन करता येणार नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत अधिक जोमाने काम करायची गरज आहे. सरकारचे चुकीचे धोरण सामान्य नागरिकांना सांगा, असे आवाहन त्यांनी सदस्यांना केले. या वेळी विधानसभेचे गटनेते जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह सर्वच सदस्य उपस्थित होते.

सत्तेचा गैरवापर - पवार
सरकारकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ते म्हणाले, की जनतेचे प्रश्‍न आक्रमकपणे सभागृहात मांडा. सरकार नमले पाहिजे, अशा आक्रमकपणे मुद्दे मांडायला हवेत. सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यातील बाजार समित्या बरखास्त केल्या जात आहेत. तसेच निवडणूकही घेतली जात नाही. नेत्यांनीही आता आपल्या केबिनमधून बाहेर पडले पाहिजे. लोकांपर्यंत जा, त्यांच्या समस्या जाणून घ्या, त्या सभागृहात मांडा, अशी सूचना अजित पवार यांनी केली.

Web Title: failed alliance by prithviraj chavan