तुम्ही पिस्ता समजून शेंगदाना तर खात नाही ना? वाचा... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

  • शेंगदाण्याचा बनविला जातो पिस्ता 
  • क्राईम ब्रॅंचचा कारखान्यावर छापा 
  • 20 पोती शेंगदाना जप्त 
  • थंडीची चाहूल लागताच वाढते सुकामेव्याची मागणी 

नागपूर : थंडीची चाहूल लागताच सुकामेव्याची मागणी वाढते. यंदा थंडीची चाहूल जरा उशिरा लागली असली तरी थंडीचा जोर हळूहळू वाढू लागला आहे. यामुळे शहरात ड्रायफ्रूट्‌स विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात सुकामेवा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. याचा लाभ बनावट ड्रयफ्रूट विक्रेते घेतना दिसून येत आहेत. बाजारात रस्त्यावर बसणारे ड्रायफ्रूट विक्रेते सर्वांत स्वस्त ड्रायफ्रूट असल्याचे सांगून बनावट ड्रायफ्रूट विक्री करताना दिसून येत आहे.


शेंगदानाचा बनविलेला पिस्ता 

थंडीच्या ऋतूत सुकामेव्यामुळे शरीरात उष्णता वाढविण्याबरोबर वाढीसाठी आवश्‍यक असणारी प्रथिने, स्निग्ध, विविध जीवनसत्वे पुरवण्याचे महत्त्वाचे कार्य होत असते. याद्वारे शरीराची झीज भरून काढण्यासाठी उपयुक्त पोटॅशियम, मीठ, कॅल्शियम आदी घटक द्रव्यांसाठी हिवाळ्यात सुकामेव्याचे सेवन केले जाते. पिस्तात फाइबर, प्रोटीन, विटामिन सी, झिंक, तांबा, पोटॅशियम, लोहा, कॅल्शियम आणि अनेक अन्य पोषक तत्व असतात. हे फक्त शरीरासाठी चांगलेच असतात असं नाही तर पिस्ता खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात. 

Image may contain: food
भिजवलेला शेंगदाना

हिवाळ्याच्या दिवसांत काजू, बदाम, गोडंबी, मनुका, खारीक, खोबरे या पदार्थांना मोठी मागणी असते. हीच मागणी लक्षात घेऊन बोगस पिस्ता बाजारात विक्रीसाठी आला आहे. ग्राहकही दुकानांपेक्षा स्वस्त मिळत असल्याने बनावट ड्रायफ्रुटकडे आकर्षित होतात.

No photo description available.
शेंगदाणा पिस्त्याप्रमाणे कापण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन

आपण खात असलेला पिस्ता चक्‍क नकली आहे, असे म्हटलं तर तुमचा विश्‍वास बसणार का? तुम्ही नाहीच म्हणाल. काहीही सांगता असे काही तरी म्हणाल. पण हे खरे आहे. बाजारात स्वस्त दरात मिळणारा पिस्ता हा अर्ध्यापेक्षा कमी किंमतीच्या शेंगदान्यापासून बनवित असल्याचा प्रकार नुकताच उपराजधानीत उघडकीस आला आहे. 

शेंगदाण्याला हिरवा रंग

पाचपावली, तांडापेठ या परिसरात मोठ्या प्रमाणात सोनपापडीचे कारखाने आहेत. देशभरात नागपूरच्या सोनपापडीला मागणी आहे. या सोनपापडीत पिस्ता वापरण्यात येतो. यामुळे पिस्ताची विशेष मागणी आहे. नरेश दशरथ बोकडे (वय 45, रा. गोळीबार चौक, जागनाथ बुधवारी) हा शेंगदाण्याला हिरवा रंग देऊन पिस्ता म्हणून बाजारात व्रिकी करायचा. या कारखान्यावर छापा टाकून गुन्हे शाखा पोलिसांनी नरेशला अटक केली. 

No photo description available.

सव्वा लाखांचा माल जप्त

बनावट पिस्ता तयार होणाऱ्या कारखाण्याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक पंकज धाडगे, हवालदार प्रशांत लाडे, रामचंद्र कारेमोरे, अमित पात्रे, परवेज शेख, राजू पोतदार आणि फिरोज खान यांनी सापळा रचून कारखान्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी 20 पोती साधे शेंगदाणे, शेंगदाण्याला भाजून त्याला हिरवा रंग दिलेले चार पोती शेंगदाणे आणि दोन ते तीन पोती पिस्ता आणि शेंगदाणा पिस्त्याप्रमाणे कापण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन असा एकूण एक लाख 35 हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

Image may contain: 2 people
पंकज धाडगे

आणखी काही कारखाने सुरू
नकली पिस्ता बनविण्यात येत असल्याची माहिती मिळताच सापळा रचून कारखाण्यावर छापा टाकला. यावेळी शेंगदाण्याचा नकली पिस्ता बनविण्यात येत असल्याचे लक्षात आले. अशाप्रकारचे आणखी काही कारखाने सुरू असल्याची माहिती असून, लवकरच कारवाई करण्यात येईल. 
- पंकज धाडगे, 
सहायक पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fake pistachios in the market