तोतया पीएसआयने लावला घरमालकाला चुना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

नागपूर  : हिंगणा भागात भाड्याच्या घरी राहत असताना घरमालकाला आपण गणेशपेठ पोलिस ठाण्यात "पीएसआय' पदावर कार्यरत असल्याचे सांगून घरमालकासह आणखी एकाला तब्बल 1 लाख 70 हजारांनी चुना लावून तोतया पीएसआय पसार झाला. संजय पांडुरंग कदम असे या तोतया पीएसआयचे नाव आहे.

नागपूर  : हिंगणा भागात भाड्याच्या घरी राहत असताना घरमालकाला आपण गणेशपेठ पोलिस ठाण्यात "पीएसआय' पदावर कार्यरत असल्याचे सांगून घरमालकासह आणखी एकाला तब्बल 1 लाख 70 हजारांनी चुना लावून तोतया पीएसआय पसार झाला. संजय पांडुरंग कदम असे या तोतया पीएसआयचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी संजय कदम हा हिंगणा हद्दीतील जे. पी. पार्क, अक्षय बिल्डिंग, कैलास पराते यांच्या घरी नोव्हेंबर 2018 पासून पत्नीसह भाड्याने राहत होता. सकाळी पत्नी त्याला जेवणाचा डबा बनवून द्यायची. तो टिफिन घेऊन डोळ्यावर गॉगल चढवित आणि रुबाबदार अशी पीएसआयची वर्दी घालून गाडीला मोठ्या जोमाने किक मारीत घरून पोलिस ठाण्यात जायचा. त्याने घरमालकाला आपण गणेशपेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याचे सांगितले. तो नियमितपणे भाड्याचे पैसे देत नव्हता. तोतया आरोपी संजय कदमने याच भागात राहणारे फिर्यादी सुनील चव्हाण (31) यांच्याकडून पत्नीची प्रकृती बरी नसल्याची थाप मारून 90 हजार रुपये घेतले. पोलिस खात्यात अधिकारी असल्याने त्याच्या या बोलण्यावर सुनील चव्हाण यांनी विश्वास ठेवला. त्यामुळे त्यांनी त्याला पैसे दिले. पुन्हा पत्नीच्या प्रकृतीचे कारण सांगून त्याने घरमालक कैलास पराते यांना 80 हजार रुपये मागितले. कुठलीही शंका मनात न बाळगता त्यांनीसुद्धा पैसे दिले. दोघांकडूनही पैसे घेतल्यानंतर आरोपी संजय कदम फरार झाला. घराला कुलूप लावून गेला असल्याने घरमालकासह फिर्यादी यांना तो काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला असावा, असा त्यांचा समज झाला. मात्र बरेच दिवस होऊनही तो परत न आल्याने आणि त्याचा मोबाईल बंद असल्याने फिर्यादींना संशय आला. त्यांनी गणेशपेठ पोलिस ठाण्यात जाऊन चौकशी केली असता त्यांना धक्काच बसला. संजय पांडुरंग कदम नावाचा कोणताही व्यक्ती ठाण्यात पीएसआय म्हणून कार्यरत नसल्याचे कळल्यावर पायाखालची जमीन सरकली. आपण फसल्या गेल्याचे लक्षात येताच त्यांनी हिंगणा पोलिस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दाखल केली. हे प्रकरण जेव्हा पोलिस ठाण्यात आले तेव्हा पोलिसांनीही कानावर हात ठेवले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तोतया पीएसआयचा शोध सुरू केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fake PSI