फाल्कन विमानाच्या कॉकपिटची निर्यात

File photo
File photo

नागपूर : मिहान प्रकल्पातील अनिल धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्कमध्ये दिस्सॉल्ट रिलायन्स एरोस्पेस कंपनीने संपूर्ण भारतीय बनावटीचे स्वयंनिर्मित पहिले चार्टर्ड जेट "फाल्कन 2000' विमानाचे कॉकपिट बनविले. या कॉकपिटचे हस्तांतरण आज कंपनीच्या संचालिका टिना अंबानी आणि त्यांचे पुत्र अंशुल अंबानी यांच्या हस्ते फ्रान्सच्या दिस्सॉल्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कॉकपिटची निर्यात फ्रान्समध्ये होणार असल्याने भारताच्या आणि मिहान प्रकल्पाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
कॉकपिट पूर्णपणे मिहान प्रकल्पात तयार करण्यात आले असून त्याची गुणवत्ताही उत्तम आहे. या कंपनीला दहा कॉकपिटची ऑर्डर मिळाली असून एका वर्षात ते पूर्ण केले जातील. 2021 मध्ये प्रकल्पातून फाल्कन उड्डाण करणार आहे. कॉकपिटची निर्मिती अनिल धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्कमध्ये दिस्सॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड कंपनीत केली आहे. या कंपनीकडून नागपुरात फाल्कन या प्रवासी विमान आणि राफेल या लढाऊ विमानाचे उत्पादन केले जात आहे. फाल्कन विमानाच्या कॉकपिटच्या असेंब्ली युनिटचे पहिल्या टप्प्यातील 30 हजार चौरस फुटांच्या परिसरात बांधकाम पूर्ण झाले आहे. 10 ते 18 आसनी "फाल्कन 2000' या चार्टर्ड विमानाच्या कॉकपिटचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी फ्रान्सहून 12 अभियंते येथे स्थायिक झालेले आहेत. तर 16 स्थानिक आयटीआय झालेल्या युवकांना प्रकल्पात नोकरी देण्यात आली आहे. नागपुरातील चार अभियंत्यांना फ्रान्समध्ये प्रशिक्षण दिले असून त्यांच्या मार्गदर्शनात 16 आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी कॉकपिटचे काम केले. या सर्वच आयआयटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फ्रान्स भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कॉकपिटच्या कामानंतर लवकरच इतरही काम सुरू करण्यासाठी रियालन्सने घेतलेल्या 126 एकर जमिनीवरील 62 एकरमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.
दिसॉल्ट या कंपनीने दुसऱ्या टप्प्यातील काम हाती घेतले आहे. त्यासाठी मिहानमध्ये सुमारे दीड लाख चौरस मीटरचे मोठे हॅंगर युनिट बांधण्यात येत आहे. हे हॅंगर फाल्कन व राफेल या विमानांच्या उत्पादनासाठी वापरण्यात येणार आहे. या कंपनीने 2021 मध्ये नागपुरातून पूर्ण तयार झालेल्या फाल्कन विमानाच्या उड्डाणाची तयारी केली आहे. त्यामुळे या विमानांवर आता "मेड इन इंडिया मिहान' असे हे विमान राहणार आहे.

फाल्कन 2000 चे वैशिष्ट्य
-दोन क्रु मेंबर आणि 10 ते 18 प्रवासी क्षमता असलेले चार्टर्ड जेट.
-850 किमी प्रतितास वेगाने उड्डयन करणार हे जेट 39 हजार फूट उंचीपर्यंत उड्डयन करू शकणार.
-1990 च्या दशकापासून फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीच्या या जेटची जगभरात बिझनेस जेट म्हणून ओळख आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com