परतीच्या पावसाने कापसाच्या प्रतवारीत घसरण 

अजय धर्मपुरीवार
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

हिंगणा, (जि. नागपूर): खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिकाची स्थिती उत्तम असताना दिवाळीत परतीचा पाऊस आला. शेतकऱ्यांवरील संकट गडद झाले. यानंतर तालुका कृषी विभागाच्या एका पथकाने शेतकऱ्यांची भेट घेऊन पिकांची पाहणी केली. परतीच्या पावसाने कापसाची प्रतवारी घसरणार असल्याचे चित्र समोर आले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

हिंगणा, (जि. नागपूर): खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिकाची स्थिती उत्तम असताना दिवाळीत परतीचा पाऊस आला. शेतकऱ्यांवरील संकट गडद झाले. यानंतर तालुका कृषी विभागाच्या एका पथकाने शेतकऱ्यांची भेट घेऊन पिकांची पाहणी केली. परतीच्या पावसाने कापसाची प्रतवारी घसरणार असल्याचे चित्र समोर आले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 
शेतकऱ्यांचे पांढरे सोने व सोयाबीनवर संक्रांत या आशयाची वृत्त "सकाळ'मध्ये प्रकाशित झाल्यानंतर त्याची दखल कृषी विभागाने घेत आज शुक्रवारी (ता. 1) हिंगणा तालुक्‍यात पिकांची पाहणी केली. हिंगणा तालुक्‍यात खरिपाचे लागवडक्षेत्र 36 हजार 766 हेक्‍टर आहे. यावर्षी कापसाचा पेरा सुमारे 23 हजार 800 हेक्‍टरमध्ये तर सोयाबीनची 1 हजार 900 हेक्‍टरमध्ये लागवड करण्यात आली आहे. रब्बी पिकांमध्ये गहू 1 हजार 625 हेक्‍टर, हरभरा 682, फुलशेती 52, ऊस 7, भाजीपाला 254, चारा पीक 187, तीळ 4 हेक्‍टर असे एकूण 2 हजार 816 हेक्‍टरमध्ये पेरणी करण्यात आली आहे. 
पिकाला आवश्‍यक तेवढा पाऊस वेळेवर यावर्षी तालुक्‍यात पडला. यामुळे पिकांची स्थिती होती. दिवाळीच्या हंगामात परतीचा पाऊस आला. या पावसाने कापूस व सोयाबीनचे गणित बिघडविले. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाबद्दल बातमी प्रकाशित होताच तालुका कृषी अधिकारी महेश परांजपे, कृषी पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी पाहाणी दौरा केला. 
किन्ही येथील शेतकरी अरविंद निघोट यांच्या शेतात कृषी कार्यालयाचे पथक दुपारी बारादरम्यान दाखल झाले. कापसाच्या पिकाची पाहणी केली. पहिला बोंडातून निघणारा कापूस ओला झाल्याचे चित्र दिसून आले. थोड्याफार प्रमाणात कपाशीला परतीच्या पावसाचा फटका बसल्याचे चित्र दिसून आले. यामुळे मागीलवर्षीपेक्षा उत्पादन कमी होणार असून कापसाची प्रतवारी ही बसणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. याबाबतची नोंद कृषी विभागाच्या पथकाने पाहणीदौऱ्यात केली. शेतकरी निघोट यांच्याशीही अधिकारी यांनी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा शासनाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडली. मायबाप सरकारने मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

परतीच्या पावसाचा फटका कापसाला बसला आहे. बोंडात पाणी गेल्याने कापसाची प्रतवारी दोन ते पाच टक्‍के घसरण्याची शक्‍यता आहे. मागील वर्षीपेक्षा कापसाचे उत्पादन यावर्षी थोड्या प्रमाणात कमी होण्याची शक्‍यता आहे. काही पिकांना या पावसाचा लाभ होऊ शकतो. 
-महेश परांजपे,
तालुका कृषी अधिकारी, हिंगणा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Falling cotton stacks fall in return