esakal | महिनाभरानंतर प्रकाशपर्यंत पोहोचली होती दिगंतच्या जन्माची बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

mandatai amte

नावाजलेल्या लोकांचं खासगी जीवन कसं असतं याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते. ही नावाजलेली माणसं मग आपल्यासाठी आदर्श असली तर? मग त्यांच्या खासगी आयुष्यातून आपल्याला प्रेरणाही मिळते. डॉ. मंदाताई आमटे तर आदर्शाचं एक उत्तम नावाजलेलं नाव. चला त्यांच्या आयुष्यात डोकावूया.. "अँखियों के झरोखों से' या नव्या सदरातून.

महिनाभरानंतर प्रकाशपर्यंत पोहोचली होती दिगंतच्या जन्माची बातमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हेमलकसा (जि. गडचिरोली) : आजपासून 47 वर्षांपूर्वी या मातीत पाऊल ठेवले आणि इथली सुखदु:खे, चालीरीती, भाषा, राहणीमान आणि जीवनसरणी हळूहळू आत्मसात झाली. इथले आदिवासीच सोयरे झाले. वेगळे आयुष्य उरलेच नाही. आदिवासींच्या समस्या, त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष पाहता पाहता प्रकाशबरोबर मीही त्यांच्या उत्थानाचा ध्यास घेतला. त्यांच्या समस्या सोडविणे हाच छंद बनला आणि त्यांचे कुटुंब हेच आमचेही कुटुंब बनले. शहरी जीवन आता परके वाटते, असे मत डॉ. प्रकाश आमटेंच्या खऱ्या अर्थाने सहधर्मचारिणी असलेल्या डॉ. मंदा आमटे यांनी व्यक्‍त केले.

23 डिसेंबर 1973 रोजी भामरागडमध्ये लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना झाली आणि तेव्हापासून तेच मंदा आणि प्रकाश आमटेंचे कायमचे घर झाले. जगातील सुधारणांचा वाराही न लागलेल्या इथल्या आदिवासींसाठी आरोग्यसेवा, त्यांच्या उत्तम शिक्षणासाठी शाळा आणि एवढेच नव्हे, तर अनाथ प्राण्यांसाठी प्राणिसंग्रहालयही आमटे दाम्पत्याने सुरू केले. त्यांचे हे सगळे अद्‌भुत कार्य आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. मात्र, ही मंडळी त्यांच्या कौटुंबिक आयुष्याविषयी कधीच बोलत नाहीत. हा धागा पकडून मंदाताईंना बोलते केले.

मंदाताई म्हणाल्या, ""मागे जाताना मला दिगंतचा जन्म आठवतो. बाळंतपणासाठी मी नागपूरला आले होते. मी बाळंत झाले. मुलगा झाला ही बातमी प्रकाशपर्यंत महिन्याभरानंतर पोहोचली. कारण, हेमलकसाचा पावसाळ्यात जगाशी संबंध तुटलेलाच असतो. त्यामुळे त्यांना दिगंतच्या जन्माची तार मिळाली नाही. शेवटी एक माणूस पाठवून त्यांना ही बातमी कळवावी लागली. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आमच्या नातवाच्या जन्माची बातमी गोव्याहून आमच्यापर्यंत 15 मिनिटांत पोहोचली आणि अनिकेतच्या मुलाचा तर जन्मल्याबरोबर व्हिडिओच पाहायला मिळाला. तंत्रज्ञानामुळे हे सगळे शक्‍य झाले आहे. तेव्हाचा काळ वेगळा होता; तरीही आम्ही खूप आनंदात होतो.''

भामरागडचा निसर्ग चित्रासारखाच सुंदर
""तेव्हा इथे वर्तमानपत्रही येत नसत. बाकी काही करमणुकीच्या साधनांचा तर प्रश्‍नच नव्हता. जगाशी संबंध जोडणारी एकच गोष्ट इथे होती आणि ती म्हणजे ट्रान्झिस्टर. त्यावेळीही इथे बीबीसी स्पष्ट ऐकायला यायचे आणि जगाच्या बित्तंबातम्या त्या माध्यमातून कळायच्या. मला गाणी ऐकायला आवडतात. एरवी याच ट्रान्झिस्टरवर मी जुनी हिंदी गाणी, मराठी भावगीते ऐकायचे. हा सगळा कामाचा व्याप वाढण्याआधी मी चित्र काढायचे. तो माझा आवडता छंद होता. नंतर मात्र वेळ मिळेनासा झाला आणि चित्र काढणे बंद झाले. मात्र, भामरागडचा निसर्ग चित्रासारखाच सुंदर आहे. त्याच्या सान्निध्यात दुसऱ्या करमणुकीची आवश्‍यकताच नाही.'' लोकहिताच्या कार्यात सर्वार्थाने गुंतलेल्या मंदाताईंनी भामरागडचे शब्दचित्रच डोळ्यापुढे उभे केले.

रोजच 150 लोकांचा रसोडा
लोकबिरादरीतील दिवाळी कशी असते, असे विचारले असता मंदाताई म्हणाल्या, ""इथे केवळ आमटे परिवार एवढेच आमचे कुटुंब नाही. इथे आदिवासींसाठी कार्य करणारे सगळे कार्यकर्ते आणि त्यांचा परिवार असे आमचे संयुक्‍त कुटुंब आहे. रोजचा स्वयंपाकही इथे सगळ्यांचा एकत्र होतो. त्या स्वयंपाकघराला इथे रसोडा म्हणतात. आम्ही 100-150 लोक रोज एकत्र जेवतो आणि दिवाळीही तशीच एकत्र साजरी करतो. दिवाळीचे पाचही दिवस दररोज एकेक फराळाचा पदार्थ करून सगळे मिळून त्याचा आस्वाद घेतो. छोटीशी पूजाही एकत्रितपणेच करतो. एवढेच रोजच्या पेक्षा काहीतरी निराळे; मात्र खूप आनंद देणारे.''

दुपारी आमचा रंगतो डाव
आता आमची मुले मोठी झाली. त्यांनी बराचसा कामाचा भार उचलला आहे. दोन्ही सुनाही याच कार्यात झोकून देऊन काम करताहेत. कामाचा पसाराही खूप वाढला असला तरी जबाबदारी वाटली गेली आहे. त्यामुळे नातवंडांबरोबर खेळायला थोडा वेळ मिळतो. आणि ते क्षण खूप सुखाचे असतात. सकाळी नातवंडे प्रकाशबरोबर प्राण्यांशी खेळतात. त्यांची देखभाल करतात. दुपारी मग आमचा पत्त्यांचा डाव रंगतो. कधी बुद्धिबळ, कधी कॅरम अशी उन्हाळ्यातली दुपार असते. बाहेर उन्हाच्या प्रचंड झळा आणि घरात मात्र नातवंडांच्या सहवासाचा सुखद गारवा.

त्यांच्या आग्रहापोटी "लगान' पाहिला
सिनेमा-नाटक पाहण्याविषयी मंदाताईंना छेडले असता त्या म्हणाल्या, ""एकदा नागपूरला आले असताना मुलांनी हट्ट धरला म्हणून "लगान' सिनेमा पाहिला होता. त्यानंतर प्रकाशच्या जीवनावर आलेल्या "डॉ. प्रकाश बाबा आमटे' या सिनेमाचा प्रीमियर शो पाहिला. इथे टॉकीज वगैरे नसल्यामुळे सिनेमे पाहणे होत नाही. पुण्याला जाणे झाले तर नाटक मात्र पाहते. सामाजिक विषयावरची नाटके आम्हाला आवडतात.''

सविस्तर वाचा - लोक बिरादरीतही शांतिनिकेतन, विद्यार्थी झाडाखाली गिरवतात धडे

सीमेपलीकडे बस्तरलाही जातो
निवांत क्षण कसे असतात, असे विचारल्यावर मंदाताई म्हणाल्या, ""आम्ही सगळे सायकली चालवत नदी किनारी जातो. नदीत पोहतो. कधी नदी पार करून छत्तीसगडच्या सीमेवरील बस्तरलाही जातो. आणि आमचे सगळ्यांचेच आवडते काम म्हणजे नदी किनाऱ्यावर चूल पेटवून आम्ही भजे बनवून खातो. हा आमच्यासाठी आनंदाचा सोहळा असतो.''
मंदाताई आणि त्यांच्या कुटुंबाच्या या जगावेगळ्या आनंद सोहळ्यात कधीतरी आपणही सहभागी व्हावे, असे वाटते.

loading image
go to top