"हो, आम्हीच केली घरफोडी"; अमरावतीत कहर करणाऱ्या 'कटरगॅंग'ने दिली कबुली

Famous Cutter gang gave confession about theft to Amravati police
Famous Cutter gang gave confession about theft to Amravati police

अमरावती ः एक किंवा दोन नव्हे तर तब्बल शहरातील तीस घरफोड्यांची कबुली देणारी कटरगॅंग पोलिसांच्या हाती लागली. जिल्हा न्यायालयाने दोघांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सुजित सहदेव भोंगारे (वय 37, रा. गायत्रीनगर) व तुषार प्रमोद इंगोले (वय 27, रा. दातेराव ले-आउट), अशी अटक दोघांची नावे आहेत. मंगळवारी (ता. दहा) रात्री दोघांना अटक केली. बुधवारी (ता. 11) त्यांना तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर हजर केले.

शहरात गत दीड ते दोन वर्षांत या दोघांनी मिळून या घरफोड्या केल्याची कबुली तपास अधिकाऱ्यांपुढे दिली. काही महिन्यांपासून राजापेठसह इतर ठाण्यांच्या हद्दीतील बंद घरांवर पाळत ठेवून त्यांचे कुलूप गॅसकटरने कापून आत घुसणे, ज्याठिकाणी कटर चालत नाही तेथे पेचकच, टॉमी व आरीचा वापर करून आपला हेतू साध्य करण्याची या दोघांची पद्धत होती. 

दीड वर्षापूर्वी सुजित हा फूटपाथवर चायनीजची गाडी लावायचा तर तुषार हा एका खासगी प्रतिष्ठानात नोकरीला होता. परंतु मागील दीड ते दोन वर्षांत आलिशान घरात ते राहायला गेले. महागड्या वस्तू वापरण्याचा त्यांचा छंद झाला. दिवसभर टेहेळणी करून शक्‍य असेल तर दिवसात आणि वर्दळीच्या ठिकाणी रात्रीतून ते घर फोडून ऐवज लंपास करण्याची त्यांची पद्धत होती. 

शहरात राजापेठ, गाडगेनगर, फ्रेजरपुरा, बडनेरा आणि कोतवाली हद्दीत मोठ्या घरफोड्या झाल्या आहेत. त्यात या दोघांनी सहभागाची कबुली दिली. सद्य:स्थितीत त्या दोघांकडून गॅसकटर, पेचकच, टॉमी, आरीसह दोन एलईडी अशी सामग्री जप्त करण्यात आल्याचे राजापेठ पोलिसांनी सांगितले.

चोरीचे दागिने घेणारे रडारवर

सुजित व तुषार हे दोघे पहिल्यांदाच पोलिसांच्या हाती सापडले. त्यांनी गुन्ह्यातील बरेचशे दागिने शहरात आणि काही बाहेर जिल्ह्यांतील सुवर्णकारांकडे विकल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. त्यामुळे गुन्ह्यातील ऐवज घेणाऱ्यांचा समाचार तपास यंत्रणा घेतील, असे दिसून येते.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com