कुख्यात नक्षली कमांडर पहाडसिंग पोलिसांना शरण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

जहाल नक्षलवादी पहाडसिंग याने नुकतेच छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. नक्षल चळवळीत पहाडसिंग हा अशोक, गोपी, निरीगसाय, टिपू सुलतान, बाबूराव तोफा या नावांनीही ओळखला जात होता. मात्र, त्याचे खरे नाव कुमारसाय कतलामी असे आहे. 

गडचिरोली : गेल्या दीड दशकापासून उत्तर गोंदिया-गडचिरोली जिल्ह्याचा सीमावर्ती भाग आपल्या हिंसक कारवायांनी हादरवून सोडणारा व सध्या मध्यप्रदेशातील बालाघाट परिसरात नक्षल चळवळीचा विस्तार करण्याच्या कामात गुंतलेला जहाल नक्षलवादी पहाडसिंग याने नुकतेच छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. नक्षल चळवळीत पहाडसिंग हा अशोक, गोपी, निरीगसाय, टिपू सुलतान, बाबूराव तोफा या नावांनीही ओळखला जात होता. मात्र, त्याचे खरे नाव कुमारसाय कतलामी असे आहे. 

छत्तीसगढमधील फाफासार (ता. छुरिया, जि. राजनांदगाव) या गावचा मूळचा रहिवासी असलेला पहाडसिंग नक्षली दलममधील सुशिक्षित चेहरा म्हणून ओळखला जायचा. पदवीधर असलेल्या पहाडसिंगने अंबागढ येथे काही काळ शिक्षक म्हणून कामही केले होते. 2003मध्ये तो नक्षल दलममध्ये सहभागी झाला. 2015 पर्यंत तो उत्तर गडचिरोली व गोंदिया विभागाचा कमांडर होता. नंतर त्याच्यावर नक्षल्यांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड अशी तीन राज्ये मिळून तयार केलेल्या एमएमसी झोनची जबाबदारी सोपविण्यात आली. या झोनमध्ये गोंदिया, बालाघाट, राजनांदगाव व सीमावर्ती भागातील अन्य काही जिल्ह्यांचा समावेश आहे. 
बालाघाट परिसरातच नक्षल चळवळीचा विस्तार करण्याचे श्रेय पहाडसिंगला जाते. त्याच्या नावावर 60 पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद असून, 15 वर्षांत त्याने अनेकांना ठार केले आहे. गडचिरोली पोलिसांनी त्याच्यावर 16 लाखांचे, तर छत्तीसगड पोलिसांनी 25 लाखांचे बक्षीस ठेवले होते. अन्य राज्यांनीही त्याच्यावर बक्षीस ठेवले होते. प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या. 

पहाडसिंग बनला नक्षली -
पहाडसिंगची पत्नी शकुनीबाई 2001 ते 2003 या काळात फाफामार गावची सरपंच होती. गावातील विकास कामांवरून पहाडसिंगची पत्नी आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला. त्यातून शकुनीबाईवर अविश्वास ठराव आणला गेला व तिला पायउतार व्हावे लागले. त्यामुळे पहाडसिंग चिडला व त्याने थेट बंदूक हाती धरून नक्षल दलममध्ये प्रवेश केला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The famous Naxal commander Pahadsingh surrendered to the police