फॅन्सी नंबर प्लेट ‘रडार’वर 

राजेश प्रायकर 
रविवार, 10 जून 2018

नागपूर - मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांवर ‘दादा’, ‘बाबा’, ‘भाऊ’ या नावासदृश्‍य नंबर प्लेट लावणे गुन्हा आहे. मात्र, शहरात अशा पद्धतीच्या फॅन्सी नंबर प्लेटची वाहने बिनबोभाट फिरत आहेत. शहरातील चौकाचौकांमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमऱ्यांना ‘दादा’ ‘बाबा’, ‘भाऊ’ची ॲलर्जी असल्याचे आढळून आले. त्यामुळे या फॅन्सी नंबर प्लेटच्या वाहनांवर कारवाईसाठी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सीईओंनी आरटीओ, पोलिस आयुक्तांना पत्र पाठविले. 

स्मार्ट ॲण्ड सेफ सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील प्रत्येक चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. शहरातील गुन्हेगारीसह वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहनचालकांवर नजर ठेवण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले आहे. 

यासाठी स्मार्ट ॲण्ड सेफ सिटी प्रकल्पांतर्गत ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्नेशन सिस्टिम प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. एखाद्या वाहनधारकाने सिग्नल चुकविला असेल, स्टॉपलाईनच्या पुढे आला असेल, हेल्मेटचा वापर करीत नसेल, अशावेळी त्याच्या वाहनाच्या क्रमांकावरून त्याचा संपूर्ण तपशील मिळविण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त आहे. त्यामुळे संबंधित वाहनचालकावर दंड आकारणे शक्‍य होते.

साध्या नंबर प्लेटची वाहने या प्रणालीमुळे तत्काळ ओळखली जातात. परंतु ‘दादा’, ‘बाबा’, ‘भाऊ’, ‘मराठा’ अशा नावासदृश्‍य नंबर प्लेटपुढे ही प्रणाली अपयशी ठरत आहे. त्यामुळे अशा वाहनधारकांवर हेल्मेट, सिग्नल जम्प करण्यावर दंडात्मक कारवाई करणे किंवा चौकात अशा वाहनधारकांना वाहतूक नियमांबाबत संदेश देणे अशक्‍य झाले आहे. परिणामी अशा वाहनधारकांवर वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करावी, असे पत्र स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांनी आरटीओसह पोलिस आयुक्त, वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्तांना पाठविले आहे.   

स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांचे पत्र मिळाले. फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाई गांभीर्याने सुरू करण्यात आली. यासाठी विशेष कारवाईची मोहीम राबविण्यात येईल. नागरिकांनी फॅन्सी नंबर प्लेट टाळावी. 
- डॉ. के. व्यंकटेशम्‌, पोलिस आयुक्त, नागपूर.

Web Title: Fancy number plate issue nagpur news