फार्मासिस्टला 3 कोटींच्या खंडणीसाठी धमकी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 November 2019

नागपूर : कुख्यात चेनस्नॅचरने अवैध सावकारी सुरू करून फार्मासिस्टला धमकावून उधार दिलेल्या रकमेच्या तिप्पट व्याज वसूल केले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर धमकावून तीन कोटींची खंडणी उकळण्याचाही प्रयत्न केला. प्रतापनगर पोलिसांनी याप्रकरणी चेनस्नॅचरवर खंडणीखोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

नागपूर : कुख्यात चेनस्नॅचरने अवैध सावकारी सुरू करून फार्मासिस्टला धमकावून उधार दिलेल्या रकमेच्या तिप्पट व्याज वसूल केले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर धमकावून तीन कोटींची खंडणी उकळण्याचाही प्रयत्न केला. प्रतापनगर पोलिसांनी याप्रकरणी चेनस्नॅचरवर खंडणीखोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 
राकेश डेकाटे (48) रा. उज्ज्वलनगर, सेंटर पॉइंट हॉटेल मागे, वर्धा रोड असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार एसई रेल्वे कॉलनीतील रहिवासी सचिन बडजाते (42) यांचे प्रतापनगर हद्दीत सचिन मेडिकल स्टोअर आहे. दुकानासाठी सचिन यांनी 2014 मध्ये आरोपीकडून व्याजावर काही रक्कम घेतली होती. राकेश गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे कळताच सचिन यांनी तातडीने रक्कम फेडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. यानंतरही आरोपीने धमकावून तीन वर्षांत सचिन व त्यांच्या मोठ्या भावाकडून मूळ रकमेच्या तीनपट राशी उकळली. औषध दुकान चांगले चालत असल्याने तो मागील 2 वर्षांपासून फार्मसी आणि घरासमोर येऊन दोन्ही भावांना दीड लाखाची मागणी करीत होता, अन्यथा धंदा खराब करण्याची धमकी द्यायचा. आरोपीने धमकावून 30 जूनला दीड लाख, 6 सप्टेंबरला 2 लाख, 26 सप्टेंबरला 1 लाख 55 हजार, 13 ऑक्‍टोबरला 84 हजार रुपये उकळले. 
30 ऑक्‍टोबरला पुन्हा आरोपीने सचिन यांना मोबाईलवरून तीन कोटींची मागणी करीत धमकावले. यामुळे सचिन आणि त्यांचे कुटुंबीय घाबरले. त्याच दिवशी आरोपी आपल्या आलिशान कारने फार्मसीसमोर आला. सचिनला आवाज दिला. अर्धा तास वाट बघितल्यानंतर आरोपी निघून गेला. पुन्हा सचिनच्या मोबाईलवर कॉल करून, तीन कोटी दे अन्यथा टपकवून देण्याची धमकी दिली. रात्री 11 वाजताच्या सुमारास आरोपी बडजातेंच्या घरी गेला. सचिनचे वडील जैनेंद्रकुमार आणि आत्या भारती रोकडे यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. आरोपीने त्यांनाही शिवीगाळ केली. घटनेबाबत कळताच सचिन घरी आले. आरोपीने त्यांनाही धक्काबुक्की केली. फोनवरून पोलिसांना माहिती मिळाली आणि ते सचिन यांच्या घरी पोहोचले. यामुळे आरोपी वाहनासह पळून गेला. सततच्या धमक्‍यांना कंटाळून बडजाते कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली. त्याआधारे प्रतापनगर पोलिसांनी खंडणीसह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmacist were asked to gave 3 crore