विदर्भ नदीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : पावसाच्या खंडामुळे सोयाबीन, कपाशीची पिके डोळ्यांसमोर करपल्याचे पाहून एका सत्तर वर्षीय शेतकऱ्याने विदर्भ नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्‍यातील अशोकनगर या गावात उघडकीस आली.

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : पावसाच्या खंडामुळे सोयाबीन, कपाशीची पिके डोळ्यांसमोर करपल्याचे पाहून एका सत्तर वर्षीय शेतकऱ्याने विदर्भ नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्‍यातील अशोकनगर या गावात उघडकीस आली.
भास्कर दत्तूजी राजनकर (वय 70), असे जीवनयात्रा संपविलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्‍यातील अशोकनगर येथे ते मागील अनेक वर्षांपासून पाच एकर शेतीत उत्पन्न घेऊन संसाराचा गाडा चालवीत होते. जून महिन्यात 28 तारखेला या परिसरात पहिला दमदार पाऊस झाल्याने दोन एकर शेतात कपाशी, तर तीन एकरमध्ये सोयाबीनची पेरणी त्यांनी उसनवारी घेऊन केली. दोन्ही पिके शेतात उभी राहिली, मात्र दहा दिवसांपासून पाऊसच नसल्याने वाढत्या तापमानाने या पिकांनी मान खाली टाकल्या. तर अर्ध्या शेतातील पिके करपली. दररोजप्रमाणे मंगळवारी (ता.16) भास्कर राजनकर हे सकाळी आठ वाजता पाणी आणि जेवणाचा डबा घेऊन शेतात गेले, परंतु दुपारी घरी परत आले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.
दरम्यान, डवरणी करून घराकडे परतत असलेल्या शेतमजुरांना विदर्भ नदीपात्रात एक मृतदेह दिसला. या घटनेची माहिती कुऱ्हा पोलिसांना देण्यात आली. त्यावरून कुऱ्हा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. मृत भास्कर राजनकर यांच्यावर अशोकनगर सेवा सहकारी सोसायटीचे एक लाखाचे कर्ज आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व दोन मुली आहेत.
पावसाने केला घात
सोसायटीचे कर्ज व यंदा उसनवारी घेऊन पेरणी केल्यावर पावसाने दगा दिला. पिकाची अवस्था पाहून आपल्या वडिलाने विदर्भ नदीच्या पात्रात आत्महत्या केली, असे त्यांचा मुलगा राजा राजनकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer commited suicide