बॅंकेने नाकारले कर्ज, पिकांनीही सोडली साथ; मग शेतकऱ्याने घेतला हा निर्णय आणि...

Farmer commits suicide after bank refuses loan
Farmer commits suicide after bank refuses loan

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही व नवीन कर्जासाठी बॅंकेने सुद्धा नाकारल्याने चिंतित असलेल्या शेतकऱ्याने अन्नपाणी वर्ज्य केले. अन्न-पाणीच सोडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना धामणगाव रेल्वे तालुक्‍यातील ढाकुलगाव येथे घडली. गुणवंत रामदास म्हात्रे या शेतकऱ्याचा पुन्हा एकदा व्यवस्था व निसर्गाने बळी घेतल्याचे समोर आले आहे.

तालुक्‍यातील ढाकुलगाव येथे राहणारे गुणवंत रामदास म्हात्रे यांच्याकडे चार एकर शेती आहे. कोरोना वैश्विक महामारीच्या कारणाने मजुरी करून शेती चालवणाऱ्या या कुटुंबाच्या हाताला काम नव्हते. दरम्यानच्या काळात खाजगी कर्ज काढून कसेबसे शेतीत सरकीचे 'बी' पेरून कपाशीची लागवड केली. मात्र, त्यातही डोब आल्याने दुबार पेरणी करावी लागली. आता पैशाची अडचण होती. यासाठी भारतीय स्टेट बॅंकेच्या अंजनसिंगी शाखेत जाऊन काही दिवसांपूर्वीच गुणवंतरावांनी मला कर्ज मिळेल का, याबाबत विचारणा केली होती.

मात्र 2018 चे अगोदरच अंगावर असलेले 50 हजार रुपयांचे कृषीकर्ज अद्यापही माफ झाले नसल्याने व कर्जमाफीच्या यादीत गुणवंतरावांचे नावसुद्धा नसल्याचे स्पष्ट झाल्याने नवीन कर्ज मिळणे शक्‍य नसल्याने बॅंकेतून त्यांना परत यावे लागले. घरी परतलेल्या गुणवंतराव यांना कर्जमाफीचा अर्ज भरूनही यादीत नाव नसल्याचा चांगलाच धसका बसला होता. आता शेती करावी कशी व बॅंकेच्या कर्जाची व व्याजाची परतफेड होणार कशी, हा एकच विचार त्यांच्या मनात होता.

याबाबत मुलगा वैभव म्हात्रे याच्यासोबत ते बोलले होते. सततच्या चिंतेतून त्यांनी खाणे-पिणे सोडले. त्यामुळे प्रकृती खालावत गेली. चार दिवसांपूर्वी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता अशक्तपणामुळे संदर्भसेवा देण्यात आली. मात्र, त्यांनी ती नाकारली व अखेर सोमवार, 6 जुलै रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या मागे पत्नी व मुलगा वैभव असून मागील 15 दिवसात त्यांनी कर्जाच्या काळजीत जेवण बंद केल्याचे मुलगा वैभव याचे म्हणणे आहे.

कर्जमाफीच्या लाभाची प्रतीक्षा, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे झालेली कोंडी, नापिकी, नैसर्गिक आपत्ती, हमीभाव अशा अनेक कारणांमुळे देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रातून होत असून शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात राज्य व केंद्र शासन अपयशी ठरत असल्याची भावना शेतीतज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळे ढाकुलगाव येथील गुणवंत म्हात्रे या शेतकऱ्याला कर्जमाफीचा अर्ज केल्यानंतरही यादीत नाव नसल्याने नवीन कर्ज मिळणे व कर्जमाफीचा लाभ मिळणे कठीण झाले व याच विवंचनेत पुन्हा एका शेतकऱ्याचा नैसर्गिक आपत्ती व प्रशासकीय व्यवस्थेने बळी घेतला असल्याचे समोर आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com