शेतकऱ्याने सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्‍टर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

पापळ (जि. अमरावती) : जुलै महिना संपत आला; तरी अद्याप दमदार पाऊस न झाल्याने पिके करपू लागली आहेत. मागील 25 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील पिंपरी निपाणी येथील एका शेतकऱ्याने करपलेल्या सोयाबीनवर ट्रॅक्‍टर फिरवून 9 एकर शेत नांगरून काढले. हमीदखॉं पठाण, असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.

पापळ (जि. अमरावती) : जुलै महिना संपत आला; तरी अद्याप दमदार पाऊस न झाल्याने पिके करपू लागली आहेत. मागील 25 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील पिंपरी निपाणी येथील एका शेतकऱ्याने करपलेल्या सोयाबीनवर ट्रॅक्‍टर फिरवून 9 एकर शेत नांगरून काढले. हमीदखॉं पठाण, असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पिंपरी परिसरात मागील 20 ते 25 दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे सोयाबीन पीक करपले आहे. आता पाऊस आला तरी त्याचा फारसा काही फायदा नसल्याने हमीदखॉं यांनी उभ्या शेतात ट्रॅक्‍टर फिरविले. त्यांना पेरणीसाठी एकरी 7 हजार रुपये खर्च आला. संपूर्ण 9 एकरांतील पेरणीसाठी 63 हजार रुपये लागलेत. विशेष म्हणजे शेतात पेरणीसाठी त्यांनी दागदागिने गहाण ठेवून बॅंकेकडून कर्ज घेतल्याचे सांगण्यात येते. पिंपरी निपाणी परिसरातील 80 टक्के शेतांमधील पिके करपली असून आता पाऊस आला; तरी त्याचा फायदा नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पिंपरीच्या सरपंचांनी व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांकडे पीकपाहणी करून पंचनामे करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. संपूर्ण कर्जमाफी व पीकविमा कंपनीस तत्काळ सर्वेक्षणाचे आदेश द्यावेत, अशी मागणी सरपंच विशाल रिठे, हमीदखॉं पठाण, शुभम अतकरी, उमेश रिठे, विलास रिठे, गणेश रिठे, समीर पठाण, कुमार थोरात, सलीम पठाण, विलास वाघमारे, सचिन रिठे आदींनी केली. तसेच उपोषणाचा इशारा दिला आहे.
आमदारांनी केली पाहणी
नांदगाव तालुक्‍यात पावसाने दडी मारल्याने सोयाबीन व कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी करपलेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आमदारांनी नांदगाव तालुक्‍यातील कोदोरी, पिंपळगाव बैनाई, टाकळी कानडा, पिंप्री निपाणी, राजना, काजना, बोरगाव, टाकळी गिलबा या गावांना भेटी देऊन शेतात पाहणी केली. या वेळी पंचायत समिती सभापती बाळासाहेब इंगळे, सचिन रिठे, विनोद चौधरी, दिनेश केने, विशाल रिठे, सुशील थोरात, शेख हकीम, विकास केने, गजानन देवकर आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer destroyed soyabean crop