कीटकनाशकाच्या विषबाधेने शेतकऱ्याचा मृत्यू

file photo
file photo

कुंभा (जि. यवतमाळ) : कीटकनाशक औषधांच्या फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकऱ्याचा नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. 3) रात्रीदरम्यान उघडकीस आली. पुरुषोत्तम गोविंद किनाके (वय 39, रा. साखरा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
किनाके यांच्याकडे सामूहिक दहा एकर शेती आहे. पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने मागील तीन दिवसांपासून सतत फवारणी करून पीक वाचविण्याचा प्रयत्न ते करीत होते. दरम्यान, गेल्या बुधवारी (ता. 2) फवारणी करून तरुण शेतकरी घरी आला. भोवळ येऊन कोसळल्याने त्याला तत्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला वणी येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती अधिकच खालावल्याने गुरुवारी दुपारी नागपूरला हलविले. श्‍वसनातून कीटकनाशक औषध रक्तात मिसळल्याने नागपूर येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे आईवडील, पत्नी, मुलगी, मुलगा, बहीण व बराच मोठा आप्तपरिवार आहे. घरातील एकमेव कर्तापुरुष गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.
प्रतिबंधित औषधांची विक्री
कीटकनाशक औषधांच्या फवारणीमुळे विषबाधा होऊन 2017 मध्ये तालुक्‍यातील चार शेतकरी व शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागला होता. प्रशासकीय यंत्रणा विषबाधेचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा करीत आहे. प्रत्यक्षात अजूनही प्रतिबंधित औषधाची खुलेआम विक्री तालुक्‍यात होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
सुरक्षाकिटचा अभाव
फवारणी सुरक्षाकिटसुद्धा अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाहीत. कृषी केंद्रचालक शेतकऱ्यांना औषधांचे मिश्रण करून फवारण्याचा सल्ला देत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com