दुर्दैव! पोळ्याआधीच बैल धुताना शेतकरी बुडाला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

मोहदा (जि. यवतमाळ) : येथून जवळच असलेल्या झोटिंगधार तलावावर बैलाची अंघोळ करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पोळ्याच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (ता. 29) दुपारी दोनच्या सुमारास घडली. भीमराव लहानू मेश्राम (वय 55, रा. झोटिंगधार) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

भीमराव मेश्राम हे गुरुवारी दुपारी दोनला बैलांना अंघोळ घालण्यासाठी तलावाच्या काठावर गेले होते. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने ते त्याच ठिकाणी बुडाले. दरम्यान, भीमराव यांच्या मुलांना बैल तलावाच्या शेजारी दिसले. परंतु, वडील दिसत नसल्याने त्यांनी याबाबतची माहिती गावचे पोलिस पाटील पीयूष गबराणी यांना दिली. त्यानंतर ग्रामस्थांसह तलावाच्या शेजारी व तलावात शोधाशोध सुरू केले. मात्र, गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास भीमरावचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. पोलिस पाटील गबराणी यांनी याबाबतची माहिती पांढरकवडा पोलिस ठाण्याला कळविली. त्यानंतर उपनिरीक्षक मंगेश भोंगडे, सचिन मकराम यांना घटनास्थळी धाव घेत मध्यरात्री दोन वाजता पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. दरम्यान, भीमराव यांच्या मागे पत्नी, दोन मुले व दोन मुली असा आप्तपरिवार आहे.

गावात पोळा साजरा झालाच नाही
पोळ्याच्या आदल्या दिवशीच घडलेल्या या दुर्घटनेने झोटिंगधार गावात शोककळा पसरली असून, झोटिंगधारसह परिसरातील ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर शुक्रवारी (ता.30) गावात पोळा साजरा करण्यात आला नाही, अशी माहिती गावचे उपसरपंच विजय तेलंगे व पोलिस पाटील पीयूष गबराणी यांनी "सकाळ'ला दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer drown while washing bull