मुलींच्या लग्नासाठी शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत!

farmer money.jpg
farmer money.jpg

अकोला : नैसर्गिक आपत्तीमुळे मृत पावलेल्या व आत्महत्या करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांच्या मुलींच्या लग्नासाठी 21 हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषि समितीच्या सभेत सोमवारी (ता. 24 घेण्यात आला. सदर योजनांसह इतर योजनांसाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने एकूण 3 कोटी 9 लाखाचे बजेट तयार केले आहे. 

शेतीसाठी काढलेले कर्ज, उत्पादन दिसत असले तरी शेतमालाचे खर्चाला न परवडणारे दर, नापिकी व इतर कारणांमुळे त्रस्त झालेले शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे चित्र जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजना शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

दर दोन-तीन दिवसांआड एक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे सरकारी आकडे सांगत आहेत. 2015 मध्ये शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आकडा दोनशेजवळ पोहचला होता. त्यानंतरच्या वर्षांत सुद्धा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दीडशेच्या खाली पाहायला मिळाले नाही. गेल्या वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस व शेतमालाचे चांगले उत्पादन होते. त्यानंतर सुद्धा दर तीन दिवसांआड एक शेतकरी आत्महत्येची घटना घडली.

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून अकोला जिल्ह्याची विदर्भात ओळख आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवारांना मदत मिळावी यासाठी सोमवारी (ता. 24) जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत शेतकरी व शेतमजुरांच्या मुलींच्या लग्नासाठी 21 हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा ठराव घेण्यात आली. सभा सभापती पंजाबराव वडाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला प्रामुख्याने सदस्य संजय अढाऊ, मोहित तिडके, वेणू डाबेराव, अनंत अवचार, अर्चना राऊत, कृषि विकास अधिकारी व सभेचे सचिव मुरलीधर इंगळे आदी उपस्थित होते. 

कृषीसाठी 3.9 कोटींचे बजेट
कृषि समितीच्या सभेत वैयक्तीक लाभाच्या योजना मंजूर राबविण्यावर सहमती झाली. त्याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कृषी साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. प्रत्येक योजनेवर 26 लाख 50 रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे. हित्यामध्ये चार्जेबल टॅार्च, पॅावर स्प्रे, एचडीपीई पाईप, पीव्हीसी पाईप, इलेक्ट्रिक पंप, डिझेल पंप, सेपरेटर आदींचा समावेश राहणार आहे. 

यापूर्वी 90 टक्के अनुदानावर बियाण्यांचे वाटप
जिल्हा परिषदेकडून प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येते. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी आणि महिला व बाल कल्याण विभागाने 90 टक्के अनुदानावर बियाण्यांचे वाटप करण्याची योजना राबविली होती. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना स्वयंरोगजारासाठी मदत देण्याचा निर्णय कृषि समितीने घेतला होता.  

शेतकऱ्यांना मिळणार दूध काढण्याचे यंत्र
जिल्हा परिषदेत पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विषय समितीच्या सभेत शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागामार्फत मुरघास यंत्र, गाई म्हशीचे दूध काढण्याचे यंत्र, दुधाचा खवा बनवण्याची यंत्र देण्याचा ठराव घेण्यात आला. कुक्कुट पक्षी, शेळ्यांचे गट, बोकड आणि दुधाळ जनावरे वाटपांच्या योजनांसाठी निधीची तरतूद सुद्धा यावेळी करण्यात आली. पशुधनासोबत विविध यंत्र पुरवठा करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. 2020-21 साठी चार कोटी रुपयांचे बजट तयार करण्यात आले. सभेत सभापती पंजाबराव वडाळ यांच्यासह सदस्य गजाननराव डाफे, गोपाल भटकर, बाळापुर पंचायत समिती सभापती रूपाली गवई, अकोट पंचायत समिती सभापती शाहिद खान रफत सुलताना, सुमन गावंडे, मीनाक्षी उन्हाळे, पशुसंवर्धन अधिकारी आर.एच. मिश्रा व इतर उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com