
Farmer : शेतकऱ्यांना सुवर्णसंधी! शेततळ्यासाठी आता ७५ हजार रुपये अनुदान
अकोला : जिल्ह्यातील शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी शासन शेततळे योजना अनुदानावर राबवित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन व उत्पनात वाढ होऊन त्याचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंर्तगत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी ७५ हजार रुपये अनुदान देय असून, शेतकऱ्यांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागेल.
अकोला जिल्ह्यातील बहुतांश शेती ही पावसावर अवलबूंन असलेली कोरडवाहू शेती आहे. जिल्ह्यातील विविध भागातील पावसाचे असमान वितरण आणि पावसातील अनिश्चित येणारे खंड या प्रमुख नैसर्गिक आपत्ती आहेत. यामुळे सिंचना अभावी पीक उत्पादनात मोठ्या प्रमाण्यात घट येते. जिथे पाण्याचा जास्त ताण पडतो तेथील पिके नष्ट देखील होतात. पर्यायाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.
जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा ओढे, नाले, नदी इत्यादीव्दारे वाहून जाणारा अपधाव उपसून त्याची साठवणूक करण्याकरिता शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यास चालना देणे हा यावरील एक उपाय आहे. अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्या अंतर्गत जमिनीकरिता शेततळे हे वरदान ठरू शकते. शेततळे योजनेत आता १५ बाय १५ बाय ३ मी. ते ३० बाय ३० बाय ३ मी. या आकारमानातील शेततळयाच्या समावेश करण्यात आलेला आहे. तसेच शेततळयाच्या आकारमानानुसार कमाल ७५ हजार रुपये अनुदान देय राहील.