व्वा रे पठ्ठे... मजूर मिळत नसल्याने तण काढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली ही शक्‍कल... 

सिद्धार्थ गोसावी/संदीप खिरडकर  | Sunday, 26 July 2020

विशेष म्हणजे या माध्यमातून तणनाशक औषधी फवारताना पिकांना कुठलीही हानी न होता केवळ तणाचा नाश होतो, या पद्धतीने यंत्राची निर्मिती केली आहे. कोरोना संकटात मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी व कचऱ्यापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी हे यंत्र उपयोगी पडत आहे.

कोरपना/नांदा (जि. चंद्रपूर) : यंदा कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांसमोर मजुरांचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील राजुरा, कोरपना तालुक्‍यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने कापूस उत्पादक शेतीच्या कामात व्यस्त आहेत. शेतात तण वाढल्याने ते काढण्यासाठी पुरेशी मजुरांची संख्याही नाही. अशा परिस्थितीत नांदाफाटा येथील प्रयोगशील शेतकरी किशोर चौधरी यांनी घरगुती टाकाऊ वस्तूपासून तणनाशक यंत्र बनविले. तालुक्‍यातील इतर शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर जिल्ह्यातही त्यांच्या या अनोख्या यंत्राची चर्चा आहे. 

क्लिक करा - ते तुकाराम मुंढे आहे... डोळ्यांत धूळ फेकणे कठीणच, वाचा संपूर्ण प्रकार
 

इतर शेतकऱ्यांकडून अनुकरण 

विशेष म्हणजे या माध्यमातून तणनाशक औषधी फवारताना पिकांना कुठलीही हानी न होता केवळ तणाचा नाश होतो, या पद्धतीने यंत्राची निर्मिती केली आहे. कोरोना संकटात मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी व कचऱ्यापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी हे यंत्र उपयोगी पडत आहे. सध्या खरिपाचा हंगाम सुरू आहे. शेतमालाचे नुकसान न होता कमी खर्चात अधिक पिके कसे घेता येईल, याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यामुळे शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करीत असतात. असाच एक प्रयोग नांदा येथील किशोर चौधरी यांनी आपल्या शेतावर केला. तो तणनाशक फवारणी यंत्राचा. हा प्रयोग यशस्वी झाल्याने परिसरातील शेतकरी हा प्रयोग आपल्या शेतात करीत आहे. 

कोरोनामुळे मजुरांची टंचाई 

यंदा तालुक्‍यात बऱ्यापैकी पाऊस पडला. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले. शेतातील पीक चांगले आहे. मात्र, त्यासोबत शेतात कचराही वाढला. कचऱ्याची विल्हेवाट न लावल्याने पिकांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होत असतो. त्यामुळे शेतातील कचरा काढून टाकावाच लागतो. याकरिता शेतमजूर किंवा तणनाशक फवारणी करून तण नष्ट करावे लागते. यंदा कोरोनाच्या महामारीमुळे शेतमजूर मिळणे अशक्‍य झाले आहे. 

 

असे जमवले जुगाड... 

ही परिस्थिती लक्षात घेऊन नांदा येथील प्रयोगशील शेतकरी किशोर चौधरी यांनी एका तेलाच्या पिप्याचे दोन भाग केले. त्याला रॉड वेल्डिंग करीत मधोमध समान अंतरावर एक छिद्र केले. त्या छिद्रावर फवारणी पंपाचे नोझल वेल्डिंग करून फवारणी पंपाच्या सहाय्याने शेतात तणावर तणनाशक फवारणी केली. या गावठी जुगाडामुळे शेतमजुरांची मजुरी वाचली, तर दुसरीकडे शेतमालावर याचा कोणताच परिणाम झाला नाही. हे गावठी जुगाड विनाउपयोगी असलेल्या घरातीलच वस्तूंची जुळवाजुळव करून अवघ्या साठ ते सत्तर रुपयांत तयार केल्याचे किशोर चौधरी यांनी सांगितले. 

 
मजूर खर्च, वेळेची बचत 
किशोर चौधरी यांनी शेतात तणनाशक फवारणी केली. त्याच पद्धतीने मीसुद्धा शेतात फवारणी केली. त्याचा मला फायदाच झाला. माझा शेतावरील मजूर खर्च व वेळ वाचला. शेतमालाचे नुकसान झाले नाही. 
रूपेश विरूटकर, शेतकरी, नांदा 

संपादन : अतुल मांगे