शेतकऱ्याने बनविले पिकांना खत देण्याचे यंत्र

रवी दामोदर
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

अकोला - गरज ही शोधाची जननी असते, या उक्तीचा प्रत्यय अकोला तालुक्‍यातील बोंदरखेड या लहानशा गावातील शेतकरी दिनकरराव गावंडे यांनी दिला आहे. टाकाऊ वस्तूंपासून पिकांना खत देण्याचे यंत्र त्यांनी तयार केले असून, तीन मजुरांचे काम करणारे हे यंत्र परिसरातील शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरले आहे.

अकोला - गरज ही शोधाची जननी असते, या उक्तीचा प्रत्यय अकोला तालुक्‍यातील बोंदरखेड या लहानशा गावातील शेतकरी दिनकरराव गावंडे यांनी दिला आहे. टाकाऊ वस्तूंपासून पिकांना खत देण्याचे यंत्र त्यांनी तयार केले असून, तीन मजुरांचे काम करणारे हे यंत्र परिसरातील शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरले आहे.

गरिबीतून गरज, गरजेतून प्रयत्न आणि त्यातून अभियांत्रिकीचा शोध, असा प्रवास बोंदरखेडचे शेतकरी गावंडे यांनी केला आहे. त्यांनी तयार केलेले यंत्र तीन मजुरांचे काम सहज करते. मजूर मिळविण्याची चिंता व त्यावर येणारा खर्च यावर गावंडे यांनी यंत्राच्या माध्यमातून मात मिळविली आहे. मजूर मिळणे कठीण झाले आहे. गेल्या 10 वर्षांत मजुरीत दुपटीने वाढ झाली आहे. उत्पन्न घसरले असून, शेतकऱ्यांना कुटुंबाचे पालनपोषण करणेही कठीण झाले आहे. मजुरीवर होणारा अव्वाच्या सव्वा खर्च परवडणारा नाही. या समस्येवर उपाय म्हणून गावंडे यांनी घरच्या टाकाऊ साहित्यापासून टिकाऊ खतयंत्र तयार केले. त्यांचा हा अफलातून शोध गरजू शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गावंडे यांनी केलेल्या संशोधनाचे परिसरात कौतुक होत आहे.

या टाकाऊ वस्तूंपासून यंत्रनिर्मिती
पिकांना खते देणारे यंत्र तयार करण्यासाठी दिनकर गावंडे यांनी लोखंडी स्टॅंड, बकेट, कॉक, चाळी, पाईप नळ्या आदी साहित्याचा वापर केला. यासाठी केवळ 900 रुपये खर्च आला.

मजुरीची बचत
एका मजुरासाठी दिवसाला 300 रुपये द्यावे लागतात. कपाशी पिकाला खतं देण्यासाठी एकरी मजुरी खर्च जवळपास 1500 रुपयांपर्यंत होतो. परंतु दिनकरराव यांनी केवळ 900 रुपयांत बनविलेले हे यंत्र कितीही काम करू शकते. यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे खत टाकणे, वखर देणे ही दोन्ही कामे सहज व सोप्या पद्धतीने केल्या जातात. खतयंत्राद्वारे उडीद, मूग, कपाशी, सोयाबीन या पिकाला खत टाकता येते.

दरवर्षी शेतीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या खर्चाची चिंता राहायची. या समस्येचे निराकरण करण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून खत टाकण्याचे यंत्र तयार केले. यामुळे खूप फायदा झाला. तीन माणसांचे काम मी एकटाच करतो. हे यंत्र सर्व शेतकऱ्यांनी तयार करण्याची गरज आहे.
- दिनकर गावंडे, शेतकरी, बोंदरखेड.

Web Title: Farmer Manufacture machine for fertilizer