शेतकऱ्यांना मिळाले केवळ 30 टक्के पीककर्ज

File photo
File photo

शेतकऱ्यांना मिळाले केवळ 30 टक्के पीककर्ज
नागपूर : महाराष्ट्र सरकारने 15 हजार कोटींची पीक कर्जमाफी दिल्यानंतरही राष्ट्रीयीकृत बॅंकांनी जेमतेम 30 टक्केच पीककर्जाचे वाटप केल्याचे उघड झाले आहे. कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी 28 सप्टेंबरला पुण्यात झालेल्या पीककर्ज पुरवठा बॅंकांच्या समितीच्या बैठकीत कर्जवाटपाचा आढावा घेतला असता ही बाब समोर आली आहे. विशेषतः पीककर्जवाटपात असहकार्य करणाऱ्या बॅंकांमध्ये स्टेट बॅंक, महाराष्ट्र बॅंक व ग्रामीण भागात कृषी पतपुरवठा देणारी विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक आघाडीवर आहे, हे विशेष.
या बैठकीत राज्यस्तरीय बॅंकांच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हिंगोलीत 14, परभणीत 16, लातूरमध्ये 17, वाशीममध्ये 17, बीडमध्ये 19, नांदेड 18 तर, बुलडाण्यात 28, अकोल्यात 35 टक्केच कर्जाचे वाटप झाले आहे. औरंगाबादेत 53, जालन्यात 51, यवतमाळात 50 व वर्ध्यामध्ये 46 टक्के कर्जाचे वाटप सरकारी बॅंकांनी केल्याचे यावेळी सांगण्यात आले. या बैठकीत राज्यस्तरीय बॅंकांच्या समितीचे निमंत्रक व महाराष्ट्र बॅंकेचे महाव्यवस्थापक राव, सचिव थोरात, माजी सचिव मस्के इतर जबाबदार अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना पाठवलेल्या निवेदनात तिवारी यांनी म्हटले आहे की, मराठवाडा आणि विदर्भ क्षेत्रातील 14 जिल्ह्यांत 2014 पासून तीव्र दुष्काळ पडत आहे आणि 2012 पासून नापिकी होत आहे. त्यातून आलेल्या निराशेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. या संकटावर मात करण्यासाठी व कर्जात अडकलेल्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी दिली. त्यामुळे किमान 80 टक्के शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळू शकणार होते. मात्र, बॅंकांनी कर्जमाफीचा मूळ उद्देश अयशस्वी केला आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी त्वरित कृती करण्याची गरज आहे. अन्यथा शेतकरी सरकारला माफ करणार नाहीत, असा इशाराही तिवारी यांनी दिला आहे.

रिझर्व्ह बॅंक व नाबार्डने महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केल्याने, तसेच एसएलबीसी (स्टेट लीड बॅंकर्स कमिटी)च्या नाकर्तेपणामुळे राज्यातील अडचणीत असलेल्या 50 लाख शेतकऱ्यांना पतपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.
- किशोर तिवारी, अध्यक्ष, कै. नाईक शेती स्वावलंबन मिशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com