ना कर्जमाफी, ना मिळाले बोंडअळीचे अनुदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

वानाडोंगरी - कर्जमाफी होऊन जवळजवळ दोन वर्षे लोटूनही हिंगणा तालुक्‍यातील कर्जमाफीचा घोळ अजूनपर्यंत संपला नाही. कान्होलीबारा येथील भाजप कार्यकारिणीचे पदाधिकारी असलेले शेतकरी कर्जमाफीपासून तर वंचित आहेतच, पण सहा महिन्यांपासून बॅंकेच्या चकरा मारून आजपर्यंत त्यांना बोंडअळीच्या अनुदानाची रक्कमही प्राप्त झाली नाही.

कान्होलीबारा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व प्रसिद्ध शेतकरी वसंता कृष्णराव लाड हे बोंडअळीच्या अनुदानासाठी मागील सहा महिन्यांपासून ॲक्‍सिस बॅंकेमध्ये दर आठवड्यात चकरा मारत आहेत. काही त्रुटींमुळे त्यांचा धनादेश क्रमांक - १६६३२ हा ॲक्‍सिस बॅंकेमधून संबंधित कार्यालयाकडे २३ जुलै २०१८ ला परत गेला होता. तेव्हापासून कधी तलाठी, कधी कार्यालय तर आमदारांचे स्वीय सहायक यांना भेटत आहेत. यानंतर त्यांना सुधारित धनादेश क्रमांक - ०१७८१२ हा ४ जानेवारी - २०१८ ला प्राप्त झाला. पण, १२ जानेवारीपर्यंत त्यांना रक्कम मात्र मिळाली नाही. २१० शेतकरी यादीत लाड यांचे नाव हे ८८ क्रमांकावर असताना इतरांना कधीचेच पैसे मिळाले व खर्चपण झाले; पण हा सरपंच राहिलेला सुशिक्षित शेतकरी मात्र दहा हजारांसाठी बॅंकेचे उंबरठे झिजवत आहे. तसेच यांच्याकडे युको बॅंकेचे कर्ज आहे. दीड लाखाच्या कर्जमाफीसाठी ते पात्र आहेत. परंतु, दीड लाखाच्या वर कर्ज असल्यामुळे यांना कर्जमाफी मिळाली नाही. दीड लाखाची कर्जमाफी घ्यायची असेल तर यांना प्रथम २ लाख ८१ हजार रुपये भरावे लागणार आहेत. परंतु, जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे त्यांच्या शेतातील पीक वाहून गेले. पिकाचे पंचनामे झाले; पण मदत मिळाली नाही.

Web Title: Farmer No loan waiver not received cotton grant