शेतकऱ्याचा मुलगा बनला सिनेदिग्दर्शक

सुधाकर रेड्डी
सुधाकर रेड्डी

नागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत स्थलांतरित झाले आणि अतिदुर्गम भागातील मातीशी सुधाकरचीही "नाळ' जुळली. लहानपणापासूनच चित्रपटांचा लईभारी शौक म्हणून त्याने पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतले आणि मराठी मातीशी ईमान राखत शेतकऱ्याच्या मुलाने "नाळ', "देऊळ'सारखे मराठी चित्रपट सृष्टीला दिलेले चित्रपट "माईलस्टोन' ठरले.
वडिलांनी शेतीसाठी गडचिरोली गाठले. मराठी येत नसूनही सुधाकरने वडिलांसोबत मिरची विकण्यापासून तर शेतीतील माल विकण्याचे काम केले. शिक्षणासाठी हैदराबाद गाठले. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुण्यात पदव्युत्तर शिक्षणासाठी एफटीआय गाठले. येथे शिकताना मराठी समजून घेण्यासाठी अथक परिश्रम घेतले. नागपूरचा हर्षवर्धन वागधरेही पुण्यात सिनेमॅटोग्राफीचे प्रशिक्षण घेत होता. हर्षवर्धनसोबत चांगलीच गट्टी जमली आणि मराठी भाषा समजू लागली.
संवेदनशील सुधाकरने रस्त्यावर जगणाऱ्या फाटक्‍या माणसाला रोजंदारीतून मिळणाऱ्या पैशातून दोन सांजेला पोट भरण्याचा सातबारा जवळून बघितला. विदर्भात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा हिशेब हृदयावर कोरून ठेवला तर वातानुकूलित खोलीत खुर्चीवर बसून धोरण ठरवणारे व्हाइट कॉलर मराठी माणसांचा जवळून अभ्यास केला. डोंगरदऱ्यांनी भरलेल्या विदर्भाचा अभ्यास केला. गडचिरोली, भंडारा, चंद्रपूरपासून पुणे मुंबई, अमरावतीला चिखलदरा, धारणी सारख्या कुपोषित भागात फिरून मजुरी वाया गेली तर घरी संध्याकाळची भाकरी शिजणार नाही, अशा अनेक घटनांची नोंद मनाच्या कोपऱ्यात करून घेतली. हळुहळू विदर्भातील या कथा पडद्यावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुधाकर सांगतो.
सुधाकरने नागराज मंजुळे, उमेश कुळकर्णी नव्हे तर आता "झुंड'मध्ये अमिताभ बच्चन यांच्याही सोबत कॅमेरामॅनची भूमिका निभावली आहे. देऊळ या यशस्वी चित्रपटानंतर जागतिक पटलावर ऐतिहासिक यश संपादन केलेल्या मंजुळे यांच्या "सैराट'मध्ये कॅमेरा हाताळला. सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सुधारकर रेड्डी यांच्या दिग्दर्शनातील वैदर्भीय बोलीतील "नाळ'ला अभिनयातून सजविले. अख्खा नाळ चित्रपट भंडाऱ्यात एका गावात तयार झाला. खऱ्या अर्थाने विदर्भाचा पहिला मराठी चित्रपट "नाळ' यशस्वी झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
मराठी मुलखात मिळाली बंगाली सहचारिणी
मराठी भाषेचे लई ऋण आहेत. "जावू देनं वं...' या गाण्याने मराठी माणसांच्या मनामनात घर मिळाले. याच मराठी मुलखात आयुष्यातील सहचारिणी संचिता दास मिळाली. ती बंगाली आहे. तीही चित्रपटसृष्टीसोबत जुळली आहे. "नाळ'चे एडिटिंग संचितानेच केले, असे सुधाकर अभिमानाने सांगतो. तसेच तक्षशीला वागधरे, कमल वागधरे यांच्याकडून मराठीचे धडे मिळत असल्यानेच मराठी चित्रपट करण्याचा आत्मविश्‍वास मिळाल्याचे सुधाकर बोलून जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com