शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला घेतले जाळून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

शंकरने सुद्धा सहकारी संस्थेचे पीक कर्ज उचलून कपाशी लागवड केली. मात्र पावसाने जणू दडी मारली. यात अनेकांची बियाणे कोंब येऊन जागीच वाळली. शंकरने कर्ज काढून शेती केली इकडे वरून राजाने पाठ फिरवली.

वणी (जि. यवतमाळ) : वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वांजरी येथील ४० वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीला कंटाळून शनिवारी पहाटे शेतात जाऊन अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेतल्याची थरारक घटना घडली आहे.

तालुक्यातील वांजरी येथील शंकर बापूराव देऊळकर या शेतकऱ्याकडे ४ एकर शेत जमीन होती. त्याला जोड म्हणून तो भाडेतत्त्वावर काही जमीन करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. यावर्षी मृगाच्या सरी बरसल्या आणि पेरणीला सुरुवात झाली.

शंकरने सुद्धा सहकारी संस्थेचे पीक कर्ज उचलून कपाशी लागवड केली. मात्र पावसाने जणू दडी मारली. यात अनेकांची बियाणे कोंब येऊन जागीच वाळली. शंकरने कर्ज काढून शेती केली इकडे वरून राजाने पाठ फिरवली. शंकरच्या मनात चिंतेचा काहूर माजला होता. रात्री जेवण करून तो गावातील मित्रांसोबत नेहमीप्रमाणे गप्पा मारत बसला होता. रात्रभर मानत विचार घोळत होते. पहाट झाली, शंकर शेतात गेला आणि तेथे जाऊन बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतले व स्वतःला जाळून घेतले. यात शंकर ९० टक्के भाजला गेला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थानी शंकरच्या शेताकडे धाव घेतली. त्याला तात्काळ वणीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र शंकरची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूरकडे हलविण्यात आले होते. त्याला चंद्रपूर कडे नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. परत शंकरचा मृतदेह वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

शंकरच्या मागे पत्नी नीता आणि दोन मुले असा परिवार आहे. या शेतकरी आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: farmer suicide in Yavatmal