मालकी हक्‍कासाठी शेतकऱ्याने घेतले विष 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 December 2019

राजू मलय्या गोप आणि सानप यांच्या शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून वाद सुरू आहे. मात्र, तहसीलदारांच्या एकतर्फी भूमिकेने त्रस्त झाल्याने किसन सानप यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. 

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : तहसीलदारांच्या दालनात एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (ता. 12) जिवती येथे घडली. किसन सानप असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. शेतीच्या मालकी हक्काचे प्रकरण तहसीलदारांकडे होते. त्यात तहसीलदारांनी एकतर्फी भूमिका घेतली, असा सानप कुटुंबीयांचा आरोप आहे. 

किसन सानप जिवती तालुक्‍यातील शेगणाव येथील रहिवासी आहे. राजू मलय्या गोप आणि सानप यांच्या शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून वाद सुरू आहे. अयोध्या प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तेव्हा जिल्हाभरातच 144 कलम लागू करण्यात आले होते. मात्र, याच दिवशी मलय्या आणि सानप यांच्यात शेतीवरून वाद झाला. यावेळी मोठ्या संख्येत दोन्ही बाजूंनी जमाव एकत्र आला होता. परंतु, कारवाई सानप व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवरच झाली.

 

हेही वाचा - नागपूर : मेडिकलच्या टीबी वॉर्डातील स्लॅब कोसळली, एक ठार

 

तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी किसन सानप, उत्तम सानप, व्यकंटी सानप आणि तीन जामीनदारांकडून प्रत्येक पन्नास हजार रुपयांचे बंधपत्र लिहून घेतले. त्यानंतर सात डिसेंबर 2019 रोजी पुन्हा शेतीवरून वाद उफाळला. याची गोप यांनी तक्रार केली. याच तक्रारीच्या आधारे तिघांनाही चौकशीसाठी बोलविण्यात आले. गुरुवारी ते चौकशीसाठी आले असताना किसन यांनी तहसीलदारांच्या दालनातच विष प्राशन केले. या घटनमुळे तहसील कार्यालयाच्या परिसरात एकच खळबळ उडाली. 

 

Image may contain: one or more people and people sitting
रुग्णालयात उपचार घेताना शेतकरी 

किसन यांना उपचारासाठी त्वरित हलविण्यात आले, असे तहसीलदार बेडसे यांनी सांगितले. मात्र, घटनास्थळी सोबत असलेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी तहसीलदारांच्या एकतर्फी भूमिकेने त्रस्त झाल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप केला. जमिनीचा वाद सुरू आहे. परंतु, तहसीलदार धाकदपट करतात. चुकीच्या पद्धतीने दंडात्मक कारवाई करतात. कार्यालय सुटेपर्यंत बसवून ठेवणे, जमानतीसाठी पैशाची मागणी तहसीलदारांकडून केली जाते, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे किसन सानप यांनी टोकाची भूमिका घेतली.

 

असे का घडले? - चिमुकलीला अंधारात बांधून तो झाला मोकळा

 

माझा अंत्यसंस्कार तुम्हीच करा

गुरुवारी सानप यांना चौकशीसाठी बोलावले होते. संतप्त सानप यांनी जीवनयात्रा संपविण्यासाठी थेट तहसीलदार बेडसे यांच्या कार्यालयात घुसले. "साहेब तुम्ही माझे कुटुंब संपविण्यासाठी याठिकाणी बसले आहात का' असे विचारत विष प्राशन केले. माझा अंत्यसंस्कार तुम्हीच करा, असे म्हणत जागीच कोसळले, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. 

प्रकरण माझ्याकडे नाही 
सानप यांच्यावर शांतता भंग करण्याची कारवाई झाली होती. त्या चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आले होते. जमिनीचा मालकीचा हक्काचा वाद न्यायालयात सोडविण्याचा सल्ला दिला होता. ते प्रकरण माझ्याकडे नाही. त्यामुळे त्यांना जमिनीच्या प्रकरणावरून पैशाची मागणी अथवा त्रास देण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. 
- प्रशांत बेडसे पाटील, 
तहसीलदार, जिवती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer took poison in Chandrapur