सहा एकर शेतातून निघाला फक्त १० किलो कापूस; संतापून शेतकऱ्याने कपाशीवर फिरवला ट्रॅक्‍टर

सूरज पाटील | Tuesday, 10 November 2020

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे पुरता कर्जबाजारी झाला आहे. एकही हंगाम साथ देत आहे. त्यामुळे जगायचे तरी कसे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

यवतमाळ : यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांची परीक्षा पाहणारा ठरला. विविध कारणांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले. शेतातील कापूस निघण्याची वेळ आली असताना कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केले. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू नये, म्हणून तालुक्‍यातील रामनगर तांडा येथील शेतकऱ्याने आपल्या सहा एकर शेतामधील कपाशी पिकावर तणनाशक फवारून ट्रॅक्‍टर फिरविला. 

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे पुरता कर्जबाजारी झाला आहे. एकही हंगाम साथ देत आहे. त्यामुळे जगायचे तरी कसे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. रामनगर तांडा येथील सदाशिव राठोड व त्यांचा चुलत भाऊ प्रेम राठोड शेती करतात. त्यांच्याकडे सहा एकर शेती आहे. या हंगामात त्यांनी कपाशीची लागवड केली होती. राबराब राबून पीक वाढविले. कपाशीला बोंड लागली. मात्र, बोंडअळी आल्याने केवळ सहा एकरात दहा किलो कापूस निघाला. 

सविस्तर वाचा - टूथपेस्ट'वरील रंगीत पट्ट्यांचा अर्थ तरी काय?

Advertising
Advertising

आपल्यापासून इतर शेतकऱ्यांच्या शेतात बोंडअळी येऊ नये, यासाठी त्यांनी सहा एकरात तणनाशक फवारले. ट्रॅक्‍टर लावून उभे कपाशीचे पीक उपटून टाकले. या शेतकऱ्याला कर्जमाफी अथवा पॅकेजचा कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही. कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केले असताना कृषी विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी बांधावर येऊन पाहणी केली नाही. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने ठोस मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.

काय म्हणतात, शेजारी शेतकरी

प्रेम राठोड यांच्या शेजारी शेत आहे. खरीप हंगामात त्यांनी मशागत केली. रोज येऊन पिकाची पाहणी करीत होते. कपाशीच्या झाडाला बोंड लागले. परंतु, बोंडअळीने कापूस झाला नाही. दुसऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू नये, म्हणून तणनाशक फवारणी करून ट्रॅक्‍टरने पीक उपटून फेकले. शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा सुनील चव्हाण यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

सहा एकरांत कपाशीचे पीक होते. काहीच कापूस झाला नाही आणि पुढे होणार नाही. तीन मुले असून, त्यांचे लग्न करायचे आहे. नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढला आहे. ज्यांच्याकडून कर्ज घेतले होते ते आता परतफेड करण्यासाठी त्रास देत आहेत. आत्महत्या करावी, असा विचार डोक्‍यात येत आहे. मात्र, इतर शेतकरी दिलासा देऊन समाधान करीत आहे. इतके नुकसान झाले आहे, तरीदेखील कोणत्याही अधिकाऱ्यांनी शेतात येऊन पाहणी केली नाही.
- सदाशिव राठोड,
शेतकरी, रामनगर तांडा.

संपादन - अथर्व महांकाळ