Video अमरावतीच्या एसडीओ कार्यालयात घुसविले बैल

 अमरावती : एसडीओ कार्यालयात बैल नेऊन आंदोलन करताना शेतकरी.
अमरावती : एसडीओ कार्यालयात बैल नेऊन आंदोलन करताना शेतकरी.

अमरावती :  शेती वहीवाटीचे पांदण रस्ते सुरू करण्यात प्रशासनाकडून दिरंगाई होत आहेत. शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 7) थेट अमरावती उपविभागीय कार्यालयात बैलजोड्या घुसविल्या. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर बैलजोड्या कार्यालयाबाहेर काढण्यात आल्या.

जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यंदा अतिपावसामुळे पांधण रस्त्यांची कामे झाली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाले. प्रशासनाकडून पांधणरस्ते विकास योजनाचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला होता, मात्र ते तयार करण्यात प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली करण्यात आल्या नाहीत, असा आरोप प्रकाश साबळे यांच्यासह शेतकऱ्यांनी केला.

पांदण रस्त्याचा प्रस्ताव प्रलंबित
अमरावती तालुक्‍यातील 158 पांधण रस्त्यांचे प्रस्ताव मागील तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. कृषी उद्योगाची प्रगती होण्यासाठी किमान शेतीचे वहीवाटीचे कच्चे रस्ते करणे गरजेचे आहे; मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे? असा सवाल उपस्थित करण्यात आला. अमरावती उपविभागीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी सुरुवातीला धरणे दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्यासोबतच आणलेल्या बैलजोड्या एसडीओंच्या कक्षात घुसविण्याचा प्रयत्न सुरू केला.

पोलिसांनी अटकाव केला

तेथे उपस्थित पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी काहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते आणि बौलजोड्या थेट एसडीओंच्या कक्षात घुसविण्यात आल्या. त्याठिकाणी प्रकाश साबळे यांचा अधिकाऱ्यांसोबतच वादसुद्धा झाला. मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर अधिकारी कक्षाबाहेर चर्चेसाठी आले आणि बैल बाहेर काढण्यात आले.

या आंदोलनात बाळकृष्ण धर्माळे, राजेंद्र उमेकर, समीर जवंजाळ, राजेश बनारसे, राजू लोखंडे, मनीष धुर्वे, नवनीत उमेकर, सचिन अढावू, वैभव डवरे, सूर्यभान पारिसे, भीमराव मेश्राम, विजय वाकेकर, विश्‍वास डुकरे, रवींद्र समरित, उमेश घाटे आदींसह अन्य सहभागी झाले होते.

प्रशासन गेंड्याच्या कातडीचे

मागील अनेक महिन्यांपासून शेतकरी पांदण रस्त्यांसाठी विनंत्या करीत आहेत, मात्र प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही. गेंड्याची कातडी पांघरलेल्यांचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे प्रकाश साबळे यांनी सांगितले.

एसडीओंच्या कक्षात बैलांना आणण्यात आल्यानंतर एका बैलजोडीने थेट अधिकाऱ्यांच्या कक्षातच शेण टाकले. त्यामुळे आंदोलनानंतर कर्मचाऱ्यांना कक्षाची साफसफाई करावी लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com