
वीज पडून शेतकरी-शेतमजूर ठार
पांढरकवडा (जि. यवतमाळ) - तालुक्यातील पाथरी शेतशिवारातील मंगळवारी (ता. १४) दुपारी अक्षय कांबळे यांच्या शेतात शेती मशागतीचे कामे सुरू असताना अचानक विजेचा कडकडाट सुरू झाला. काही कळायच्या आत अंगावर वीज पडून दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर या ठिकाणी इतर तीन व इतर ठिकाणी दोघे असे एकूण पाच जण जखमी झाले आहेत. शेतकरी अक्षय कांबळे (वय २१) व शेतमजूर अभय भास्कर मेश्राम (वय १९) अशी मृतांची नावे आहेत.
शेतकरी अक्षय कांबळे हे स्वत: अभय मेश्राम या मजुराला सोबत घेऊन शेतात मशागतीचे काम करीत होता. यावेळी दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन आकाशात विजांचा कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. अक्षय व अभय यांनी आश्रयासाठी धाव घेतली. परंतु, ते सुरक्षित ठिकाणी पोहण्यापूर्वीच त्यांच्या अंगावर वीज कोसळली.
यात दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. तर शेतात काम करणारे मजूर साक्षी रामभाऊ दळांजे (वय १८), मानसी रामभाऊ दळांजे (वय १६), काजल भास्कर नान्ने (वय १८, रा. सर्व पाथरी) हे तिघे जखमी झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात पांढरकवडा येथे दाखल करण्यात आले. आमदार डॉ. अशोक उईके, पांढरकवडा तहसीलदार रामदास बिजे, कृषी अधिकारी राकेश दासरवार यांनी पाथरी गावाला भेट देऊन माहिती घेतली.
याच दरम्यान तालुक्यातील करणवाडी येथे देखील वीज पडून गोठ्यात बैल बांधण्यासाठी गेलेली लीला नंदू नेहारे ही महिला जखमी झाली. तर खैरगाव देशमुख येथे कृष्णाराव देशट्टीवार यांच्या शेतात दुपारी काम करीत असताना शेतमजूर तानबा टेकाम (वय३५) यांच्या अंगावर वीज पडून ते जखमी झाले. या दोघांनासुद्धा उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे दाखल करण्यात आले.
Web Title: Farmers Agricultural Laborers Killed By Lightning Five People Were Injured
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..