आता यवतमाळ जिल्ह्यातील lशेतकऱ्यांसमोर नवेच संकट..हे आहे कारण...

चेतन देशमुख | Wednesday, 5 August 2020

नेर तालुक्यातील मांगलादेवी शेतशिवार परिसरातील कापसावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. विशेष म्हणजे, हलकी व भारी ज्या ठिकाणी अनेक वर्षांपासून कपाशी पीक घेतले नाही, त्या ठिकाणीही या अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात अडकण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

यवतमाळ : यंदा कोरोनाच्या संकटात शेती व शेतकरी सापडला आहे. त्यानंतर दोन वर्षांनंतर पुन्हा गुलाबी बोंडअळीचे संकट आले आहे. नेर तालुक्‍यातील मांगलादेवी येथील शेतशिवारात बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. लष्करी अळीनेही आक्रमण केले आहे. विशेष म्हणजे, यावेळी सर्वच वाणांच्या कपाशीवर कमीअधिक प्रमाणात बोंडअळीचे आक्रमण झाले आहे.

शेती व शेतकरी अडथळ्यांची शर्यत नेहमीच पार करीत आला आहे. मात्र, यानंतरही संकटाने शेतकऱ्यांचा पाठलाग सोडलेला नाही. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांवर अनेक संकटे आलीत. त्यातूनही पुन्हा उभारी घेत शेतकऱ्यांनी संकटाला तोंड दिला आहे. फवारणीतून विषबाधा, गुलाबी बोंडअळी, ओला, कोरडा दुष्काळ, अवकाळी पाऊस अशा संकटात असताना आता कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे.

कोरोनामुळे आर्थिक फटका

कोरोनामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागला. अजूनही तशीच स्थिती शेतकऱ्यांसमोर आहे. त्यातच आता गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव काही भागांत दिसून येत आहे. त्यात नेर तालुक्‍यातील मांगलादेवीचा समावेश आहे. गेल्या २०१७मध्ये गुलाबी बोंडअळीने शेतकऱ्यांना गारद केले होते. त्यावेळी मांगलोदवी येथे बोंडअळीची सुरुवात झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे दोन वर्षांपासून याला ‘ब्रेक' लागला आहे. बोंडअळी तयार होण्याची साखळी खंडित करण्यात आली होती.

हेही वाचा : भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक प्रगतीसाठी वळले या धानाकडे; बाजारात आहे अधिक भाव...वाचा सविस्तर

शेतकरी पुन्हा संकटात

मात्र, यंदा बोंडअळी दिसू लागली आहे. मांगलादेवी शेतशिवार परिसरात तर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. विशेष म्हणजे, हलकी व भारी ज्या ठिकाणी अनेक वर्षांपासून कपाशी पीक घेतले नाही, त्या ठिकाणीही अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात अडकण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. नेर तालुक्‍यातील मांगलादेवी येथील सागर लोखंडे, मनोज दहेकर व पांढरकवडा तालुक्‍यातील खैरगाव देशमुख येथील विनोद तोटेवार यांच्या शेतात बोंडअळी आढळली आहे. त्यामुळे आता प्रशासनाने या अत्यंत गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

कृषी विभागाला माहिती द्या
बोंडअळीबाबत वृत्तपत्रातून माहिती मिळाली. दोन्ही ठिकाणी आजच त्या भागातील कृषी अधिकाऱ्यांना पाठवीत आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता प्रादुर्भाव असल्यास कृषी विभागाला माहिती द्यावी.
- नवनाथ कोळपकर, जिल्हा कृषी अधीक्षक, यवतमाळ.

जाणून घ्या : पतीने स्वतःच्याच पत्नीला केली ही विचित्र मागणी...अखेर कंटाळलेल्या पत्नीची पोलिसात धाव.. वाचा काय आहे संपूर्ण प्रकार..
 

प्रत्येक झाडाच्या फुलात अळी
माझ्याकडे दीड एकरात कपाशी लावली आहे. सध्या ५० दिवस पूर्ण झाले असून, कपाशी फुलांवर आली आहे. पिवळ्या फुलात शेंदरी, गुलाबी बोंडअळी असून, ती मोठी झाली आहे. या वर्षीही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. एका झाडाला दोन ते तीन फुले आहेत. त्यात प्रत्येकातच अळी आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्‍यता आहे.
- सागर लोखंडे, मांगलादेवी, नेर (जि. यवतमाळ).

(संपादन : दुलिराम रहांगडाले)