बळीराजा आणखी मोठ्या संकटात; धानापिकावर आता तुडतुड्यांचे आक्रमण; पुढील उपाय करा  

मिलिंद उमरे 
Friday, 9 October 2020

धान पिकावर तपकिरी, पांढऱ्या पाठीचे व हिरवे तुडतुडे प्रादुर्भाव करताना आढळून येतात. त्यापैकी तपकिरी तुडतुडे अधिक नुकसानकारक असतात व त्यांचा प्रादुर्भाव वाढत्या प्रमाणात दिसून येतो. हिरव्या लुसलुशीत दाटलेल्या पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो.

गडचिरोली : सद्य:स्थितीत गडचिरोली जिल्ह्यासह पूर्व विदर्भात धानपिकावरील तुडतुड्यांच्या प्रादुर्भावास सुरुवात झाली असून या तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) पुष्पक बोथीकर यांनी केले आहे. 

धान पिकावर तपकिरी, पांढऱ्या पाठीचे व हिरवे तुडतुडे प्रादुर्भाव करताना आढळून येतात. त्यापैकी तपकिरी तुडतुडे अधिक नुकसानकारक असतात व त्यांचा प्रादुर्भाव वाढत्या प्रमाणात दिसून येतो. हिरव्या लुसलुशीत दाटलेल्या पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. तसेच या महिन्याचा शेवटचा आठवडा व ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात प्रादुर्भाव पोषक वातावरणामुळे हमखास वाढून नुकसान संभवते. म्हणून शेतकरी बांधवांनी धानपिकात तुडतुडा आढळून आल्यास वेळीच व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र सोनापूर-गडचिरोली यांच्या वतीने बोथीकर यांनी केले आहे. 

ठळक बातमी - मृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करता अंत्यसंस्कार

प्रौढ व पिल्ले खोडावर समुहाने राहून खोडातील रस शोषण करतात. त्यामुळे झाड पिवळे व कमकुवत होते. झाडांची वाढ खुंटते. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या लोंब्यांवर विपरीत परिणाम होऊन दाणे भरण्याच्या प्रक्रियेत बाधा उत्पन्न होते. या तुडतुड्यांमुळे झाडामध्ये विषाणूंची लागण होते. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त पीक गवतासारखे खुरटल्यासारखे दिसते व लोंब्या करपल्यासारख्या दिसतात. 

जास्त प्रादुर्भाव असल्यास प्रामुख्याने बांधीच्या मध्यभागी पीक करपल्यासारखे गोलाकार खडगे पडतात. अशी झाडे पिवळी पडून करपतात व खाली पडतात. उत्पादनात लक्षणीय घट येते. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या बुंध्याजवळ निरीक्षण केल्यास असंख्य प्रमाणात तुडतुडे दिसून येतात. बरेचदा प्रादुर्भावग्रस्त झाडावर साखरेच्या पाकासारखा चिकट द्रव आढळून येतो व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. पोषक वातावरणात हा प्रादुर्भाव वाढून संपूर्ण बांधीमध्ये पसरतो. 

तुडतुड्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी हे करा 

वाजवीपेक्षा नत्र खताचा अधिक वापर करू नये. टेहळणीसाठी प्रकाश सापळ्यांच्या वापर करावा. प्रादुर्भाव झाल्यास बांधीतील पाणी सोयीनुसार 3 ते 4 दिवसासाठी बाहेर सोडावे. प्रादुर्भाव सुरू झाल्याबरोबर मेटॅरायझियम अनिसोप्ली 1.15 टक्‍के भुकटी या जैविक बुरशीचा 2.5 किलो हेक्‍टर या प्रमाणात बांधीमध्ये वापर करावा. ही भुकटी 10 ते 15 किलो कुजलेल्या शेणखाताच्या पावडरमध्ये चांगले मिसळून तसेच 1 ते 2 दिवस झाकून ठेवावे म्हणजे त्यामध्ये या जैविक बुरशीची वाढ होऊन त्याची परिणामकारकता वाढते. आवश्‍यकता भासल्यास परत 15 दिवसांनी परत या जैविक बुरशीचा वापर करावा, असेही सुचविण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी - नात्याला काळीमा फासणारी घटना, आपल्याच नातीवर अत्याचार करून आजोबाची आत्महत्या

असा करावा बंदोबस्त

तुडतुड्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच नियंत्रणासाठी बुप्रोकेजीन 25 टक्‍के प्रवाही 16 मिली लिटर किंवा इमिडॅक्‍लोप्रीड 17.8 टक्‍के 2.2 मिली लिटर किंवा फिप्रोनिल 5 टक्‍के 20 मिली लिटर किंवा ट्रायझोफॉस 40 टक्‍के प्रवाही 12.50 मिली लिटर किंवा इथोफेनप्रॉक्‍स 10 टक्‍के प्रवाही 10 मिली लिटर फ्लोनीकॅमीड 50 टक्‍के 3 ग्रॅम किंवा थायोमेथाक्‍झाम 25 दाणेदार 2 ग्रॅम यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers are in trouble now rice crops are getting damaged