शेतकरी आले रडकुंडीला 

file photo
file photo

यवतमाळ : आठवडाभरापासून मुक्कामी आलेला अवकाळी पाऊस चांगलाच ठाण मांडून बसला आहे. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन पिकाची माती केली. शेतकऱ्यांचे सर्व आर्थिक गणित खरीप हंगामातील पिकावर अवलंबून असते. मात्र, अवकाळीने शेतकऱ्यांची गुंतवणूकच पाण्यात बुडविली आहे. 
पावसाळ्यात रुसलेल्या पावसाने अवकाळी रूद्र रूप धारण केले आहे. आठवडाभरापासून सातत्याने विजांच्या कडकडाटासह कोसळत असल्याने शेतकऱ्यांच्या अश्रूंची त्यात भर पडली आहे. शेतातील पिकांकडे बघून बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान बघावयास मिळाले. दिवाळीला मुलांसाठी कपडे, गोडधोड पदार्थासाठी किराणा, फटाके घेण्याचे स्वप्न गावांगावांत रंगविल्या जात असतानाच अवकाळीचा कोप झाला. घरात विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या सोयाबीनवर बुरशी चढली. काढणीच्या प्रतीक्षेतील सोयाबीनला कोंब फुटले. तर, सोयाबीनची बोंडे सडायला लागली. गेल्या पाच वर्षांपासून एकही हंगाम साथ देत नाही. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पाचवीलाच पुजला आहे. त्यात अवकाळीने कहरच केला. हातातोंडाशी आलेला घास पुरता हिसकावून नेला. रक्ताचे पाणी करून बहरलेल्या पिकांची माती झालेली बघून शेतकऱ्यांची अवस्था गलितगात्र झाली आहे. जिल्हा ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाचा पाऊस पडत आहे. पीकविमा शेतकऱ्यांच्या छळवणुकीचे साधन ठरत आहे. महसूल प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार पंचनामे केल्या जात आहे. मात्र, त्यातून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडेल की नाही, याचे उत्तर धुसरच आहे. सत्ताधारी केवळ घोषणांचा पाऊस पाडतात. तर, विरोधक तेवढ्यापुरते ओरड करून आपली बाजू सांभाळून घेतात. शेतकऱ्यांचा कुणी वाली नाही, हे वास्तव नाकारता येत नाही. 
डोळ्यातदेखील मातीमोल होणारे पीक बघून शेतकऱ्यांच्या डोळ्याला अश्रूधारा लागल्या आहेत. अवकाळीने सर्वच हिरावून नेल आहे. आता पुन्हा काही शिल्लक राहिले नाही. तरीही अवकाळी थांबण्याचे नाव घेत नाही. आणखी किती रडवशील, अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com