...म्हणून काळवंडलं विदर्भातील पांढरं सोनं

गणेश राऊत 
रविवार, 31 मे 2020

घरातील कापूस विकला जाईल की नाही? यापुढील खरीप हंगाम कसा करायचा? पेरणीसाठी पैसे कुठून आणायचे? बी-बियाण्यांची तजवीज कशी करायची? संसाराचा गाडा कसा हाकायचा?, असे अनेक प्रश्‍न सध्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये काहूर माजवत आहेत. 

नेर (जि. यवतमाळ) : अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात तालुक्‍यातील शेतकरी कपाशी पिकाकडे वळला आहे. परंतु, कोरोनामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. खासगी खरेदी बंद असून, शासकीय खरेदी संथगतीने खरेदी सुरू आहे. तालुक्‍यातील हजारो शेतकऱ्यांच्या घरांत कापूस खचाखच भरला आहे. कापूस विक्रीअभावी शेतकऱ्याचं पांढरं सोनं काळवंडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कोरोना निमित्तमात्र असले, तरी याला शासकीय धोरणही कारणीभूत असल्याचा आरोप आता शेतकरी बांधवांकडून केला जात आहे. 

ब्राह्मणवाडा पूर्व येथे भेट दिली असता प्रत्येक घरात कापूस पडून आहे. अनेक शेतकऱ्यांचे नोंदणी केलेले नंबर अजूनही लागायचे आहेत. तर कित्येक शेतकऱ्यांची अद्याप नोंदणी झालेली नाही. त्यामुळे आपल्या घरातील कापूस विकला जाईल की नाही? यापुढील खरीप हंगाम कसा करायचा? पेरणीसाठी पैसे कुठून आणायचे? बी-बियाण्यांची तजवीज कशी करायची? संसाराचा गाडा कसा हाकायचा?, असे अनेक प्रश्‍न सध्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये काहूर माजवत आहेत. 

या प्रश्‍नांनी तालुक्‍यातील हजारो शेतकरी अस्वस्थ झाले आहे. एकट्या ब्राह्मणवाडा गावातच जवळपास शंभर शेतकऱ्यांच्या जवळ अजूनही कापूस तसाच पडून आहे. अमोल तिखे, संजय लोखंडे, तुकाराम गणोरकर, रामराम बरडे, संतोष घावडे, सुभाष लोखंडे, गजानन लोखंडे, संजय कांबळे, अनिल सांडे अशा कित्येक शेतकऱ्यांकडे शेकडो क्विंटल कापूस तसाच पडून आहे. या कापसामुळे आता खाज सुटत आहे. कापसाला आग लागण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनांत आहे. तर काहींच्या घरातील कापूस पावसामुळे ओला होण्याची भीती आहे. शासनस्तरावर कापसाची खरेदी अत्यंत संथगतीने सुरू आहे. 

हेही वाचा : माकड दोन दिवस होते विहिरीत पडून; शेतकऱ्याने घातले खाऊपिऊ... वाचा पुढे

परिसरात मोठे व जास्त उत्पादन घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. काहींचा नंबर लागला; परंतु केवळ पंचवीस-तीस क्विंटलच कापूस मोजला गेला. उर्वरित कापूस तसाच घरात पडून आहे. खासगी व्यापारी या कापसाला चार हजारावर भाव द्यायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे पांढरं सोनं काळवंडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सीसीआय व पणन महासंघाद्वारे कापूस खरेदी सुरू आहे.

ज्या शेतकऱ्यांनी नी कापसासाठी नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी आणताना केवळ 25 ते 30 क्विंटल कापूस आणण्यासंदर्भात सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांकडे उर्वरित कापसाचे काय, हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एकीकडे शासन शेवटच्या बोंडापर्यंत कापूस खरेदी करणार असं निक्षून सांगत जरी असले तरी हे लबाडाच आवतन असल्याची चर्चा गावखेड्यात सध्या सुरू झाली आहे. 

 

गावातील शेकडो घरात कापूस तसाच पडून आहे. कापूसविक्री अभावी शेतकरी अत्यंत चिंतेत आहे. पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. शेतकऱ्यांकडे पैसे शिल्लक नाहीत. खरीप हंगामाला थोडेच दिवस आता शिल्लक आहे. तेव्हा शासनाने कापूस खरेदीची गती तीव्र करून शेतकऱ्यांच्या घरातील संपूर्ण कापूस खरेदी करावा. 
-नीलेश नाल्हे, 
सरपंच, ब्राह्मणवाडा (पूर्व), ता. नेर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in crisis due to lack of cotton sales